देशाला अराजकतेच्या दिशेने ढकलणारी काँग्रेस !
यंदाच्या वर्षी ५ ऑगस्टला सोमवार होता. श्रावण मासाचा प्रारंभ होत होता. त्याच दिवशी ५ लाखांहून अधिक लोकांचा मोर्चा वावटळीसारखा ढाक्याच्या शाहबाग चौकात येऊन धडकला. बांगलादेशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचे त्यागपत्र देऊन भारतात पलायन केले; मात्र त्यांच्या मागे राहिलेला बांगलादेश हा पूर्णपणे अराजकतेच्या स्थितीत येऊन पोचला होता. पुढील काही दिवस बांगलादेशात कुणाचेच राज्य नव्हते. होती ती केवळ अराजकता, गुंडगिरी, हिंदूंचा अनन्वित छळ आणि त्यांच्या प्रचंड प्रमाणावर होणार्या निर्घृण हत्या…!
१. बांगलादेशासारखा भारतात हिंसक विद्रोह करण्याविषयी काँग्रेस नेत्यांकडून पुनरुच्चार !
जगाला हादरवणार्या या घटनेच्या दुसर्या दिवशी, म्हणजेच मंगळवार, ६ ऑगस्टला काँग्रेसचे एक वरिष्ठ पुढारी आणि माजी विदेश मंत्री सलमान खुर्शीद यांनी ‘शिकवा-ए-हिंद : द पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडियन मुस्लिम्स’, या पुस्तकाचे प्रकाशन केले. याप्रसंगी सलमान खुर्शीद म्हणाले, ‘बांगलादेशासारखा हिंसक विद्रोह भारतात सुद्धा होऊ शकतो. तशी परिस्थिती सज्ज होत आहे.’ याच प्रकाशन समारंभात ढाक्याच्या शाहबाग आंदोलनाच्या धर्तीवर वर्ष २०२० मधील देहलीतील शाहिनबाग आंदोलनाचाही उल्लेख करण्यात आला. देशाच्या दुर्दैवाने एकाही अक्षरशः एकाही काँग्रेस पुढार्याने सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्याचा निषेध केला नाही. उलट दुसर्याच दिवशी, म्हणजेच बुधवार, ७ ऑगस्टला सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ‘बांगलादेशासारख्या घटना भारतातही होऊ शकतील’, असे परत एकदा म्हटले. अर्थ आणि नियत स्पष्ट आहे. उद्देशही स्पष्ट आहे.
काँग्रेसला आपल्या देशात बांगलादेशासारखे अराजक घडवून आणायचे आहे. त्यांना हे जाणवते आहे, ‘वर्तमान परिस्थितीत आपल्या हातात सत्ता येईल, असे काही चित्र दिसत नाही. जर आपल्याला सत्ता मिळणारच नसेल, तर सत्तेवर बसलेल्यांचा खेळ बिघडवणे आवश्यक आहे.’ त्यामुळेच ही अराजकतेची भाषा बोलली जात आहे. अराजक निर्माण करण्याच्या योजना सिद्ध होत आहेत. कदाचित् अराजकतेतूनच आपल्याला परत एकदा सत्ता मिळेल, अशी काँग्रेसला भाबडी आशा आहे.
२. काँग्रेसच्या राहुल गांधींनी अमेरिकेत भारतद्वेष्ट्या नेत्यांची भेट घेण्यामागील कारणमीमांसा
गेल्या काही वर्षांमध्ये भारताने टाकलेल्या दमदार पावलांमुळे अस्वस्थ झालेली अनेक माणसे आणि देश काँग्रेसला हे अराजक निर्माण करण्यासाठी पुष्कळ साहाय्य करत आहेत. या कुणालाही आपल्या देशाशी वा समाजाशी काहीही देणे-घेणे नाही. म्हणूनच ज्या अमेरिकेत ११ सप्टेंबरला स्वामी विवेकानंद यांनी हिंदु धर्माच्या महतीचे ऐतिहासिक व्याख्यान दिले होते, त्याच अमेरिकेत ११ सप्टेंबर या दिवशी काँग्रेसच्या राहुल गांधींना स्वामी विवेकानंद आठवले नाहीत. त्यांना आठवली ती ‘इल्हान अब्दुल्लाही उमर’. ही बाई अमेरिकेतील शरणार्थी मुसलमान असून ती अमेरिकेची खासदार आहे. ही ओळखली जाते ते भारताविषयी तिच्या असलेल्या पराकोटीच्या द्वेषातून. हिने अमेरिकन संसदेत भारताविरुद्ध प्रस्ताव आणलेला आहे. तिने भारताने कलम ३७० (जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम) रहित करू नये; म्हणून आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानची ‘राजकीय अतिथी’ म्हणून ही बाई काश्मीरमध्ये जाऊन आलेली आहे. राहुल गांधींनी त्यांच्या अमेरिकेच्या दौर्यात इल्हान अब्दुल्लाही उमर आणि तिच्यासारख्या अनेक भारतद्वेष्ट्यांशी अगदी सविस्तर अन् आपुलकीची भेट घेतली.
लक्षात येत आहे का…?
३. भारतविरोधी काँग्रेसचे उघड होत चाललेले खरे स्वरूप !
राहुल गांधींच्या रूपात काँग्रेस भारतविरोधी शक्तींचे जाळे (नेटवर्क) उभारत आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांना भारताला अराजकतेच्या दिशेने रेटत न्यायचे आहे. एकदा का बांगलादेश-पाकिस्तानसारखे अराजक भारतात माजले की, भाजपचा खेळ तर संपेलच; पण काँग्रेसला त्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर अनेक संधी मिळू शकतील.
भयानक आहे हे सारे…. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि बंगाल येथे काँग्रेस आघाडीला मिळालेल्या अनपेक्षित यशाने काँग्रेसचे नेतृत्व हुरळून गेले आहे. त्यांना ‘फंडिंग’ (निधी)ही चांगले मिळाले आणि म्हणूनच त्यांना कसेही करून ही महाराष्ट्राची निवडणूक जिंकायचीच आहे. त्यासाठी ते पूर्ण शक्तीनिशी कामाला लागले आहेत.
लक्षात घ्या, ‘काँग्रेस आघाडीला मत, म्हणजे अराजकतेच्या दिशेने, बांगलादेश – पाकिस्तान होण्याच्या दिशेने पडलेले मोठे पाऊल…!’
– श्री. प्रशांत पोळ, राष्ट्रीय तत्त्वचिंतक आणि लेखक, जबलपूर, मध्यप्रदेश. (१३.३.२०२४)