जानव्याची नाही हिंदुत्वाची शपथ…!

येत्या २० नोव्हेंबर २०२४ या दिवशी महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान होणार आहे. ‘भाजपने ब्राह्मणांसाठी काही केले नाही. त्यांना ब्राह्मणांची किमत नाही, ते आपल्याला गृहीत धरतात’, वगैरे आरोप करून ‘ब्राह्मणांनी भाजपला मतदान करू नये. दुसर्‍या पक्षांना करावे. किमान ‘नोटा’चे (नकाराधिकाराचे) बटण दाबावे किंवा मतदानाला जाऊच नये’, असा सूर काढला जात आहे. ‘जानव्याची शपथ’, असा भावनेला हात घालणारा प्रचारही केला जात आहे. ही वेळ आहे, डोके शांत आणि जागेवर ठेवून विचार करण्याची… सजग रहाण्याची !

१. हिंदूंनी विधानसभेच्या निवडणुकीकडे अस्तित्वाची लढाई म्हणून बघणे आवश्यक !

पहिले म्हणजे ही केवळ निवडणूक नाही, तर अस्तित्वाची लढाई आहे आणि लढाई म्हटले की, विचारांचा गोंधळ टाळून केवळ आणि केवळ विजयाचे ध्येय ठेवून सर्वशक्तीनिशी उभे रहावे लागते. विरुद्ध बाजूने हे पक्के ओळखले आहे. त्यांच्या मनात कसलाही गोंधळ नाही. ज्यांचे आयुष्य काँग्रेसविरोधाचे राजकारण करण्यात गेले, ते समाजवादी मुकाट्याने काँग्रेसच्या वळचणीला जाऊन उभे आहेत. ज्या निखिल वागळेंना शिवसैनिकांनी डांबर फासून मनसोक्त फटकारले होते, ते उद्धव ठाकरेंचे गोडवे गात आहेत. १० ते १५ वर्षांपूर्वी मुंबईतील मुसलमानांना कुणी विचारले असते, ‘तुमचा शत्रू क्रमांक १ कोण ?’, तर त्यांनी हमखास उत्तर दिले असते ‘बाळ ठाकरे’; पण तेच मुसलमान उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला एकगठ्ठा मतदान करत आहेत आणि करणार आहेत. आपण आपल्या शत्रूच्या गळ्यात गळे कसे घालायचे ? हा प्रश्न त्यांना अजिबात पडत नाही; कारण त्यांना ठाऊक आहे, ‘ही साधी निवडणूक नाही, तर हिंदुत्वाला संपवण्याची लढाई आहे आणि त्यासाठी इतर सगळे विचार अन् मतभेद बाजूला सारून कडवेपणाने, एकदिलाने ते उभे आहेत. त्यांच्यासाठी ही निवडणूक नाही, तर धर्मयुद्ध आहे. म्हणूनच मतदानासाठी फतवे निघत आहेत, कुणाचेही मतदान राहून जाऊ नये; म्हणून ‘२० नोव्हेंबरला निकाह (लग्न) लावणार नाही’, असे काझींनी (शरीयत कायद्यानुसार न्यायदान करणारा) घोषित केले आहे. या धर्मांध, कडव्या, एकगठ्ठा मतदानाचा परिणाम आपण लोकसभा निवडणुकीत पाहिला आहे आणि तरीही आपल्या मनात मात्र अजूनही गोंधळ आहे अन् निर्माण केला जातो आहे, असे दिसत आहे.

श्री. अभिजित जोग

२. हिंदु धर्म समूळ उच्चाटनाचा प्रयत्न करणारी आघाडी

या युद्धातील दुसरी शक्ती आहे भारताचे तुकडे करण्याची आणि हिंदुत्वाला संपवण्याची शपथ घेतलेली डावी (साम्यवादी) वाळवी. वर्ष २०२२ मध्ये त्यांनी अमेरिकेत ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे उच्चाटन), अशी परिषद भरवली होती. त्या वेळी ‘आम्ही ‘हिंदुत्व’ असे म्हणत असलो, तरी हिंदु धर्मच संपल्याविना आम्ही थांबणार नाही’, अशी उघडपणे मुक्ताफळे उधळली गेली होती. त्यामुळे ‘हे काय करणार आहेत, हे आम्हाला ठाऊक नव्हते’, असे नंतर म्हणता येणार नाही.

या गटाचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे राहुल गांधी, त्यांचे गुरु सॅम पित्रोदा हे परदेशात जाऊन भारतविरोधी ‘डीप स्टेट’च्या कसे गळ्यात गळे घालतात आणि ‘भारतातील लोकशाही धोक्यात आहे, तुम्ही हस्तक्षेप करा’, अशा विनवण्या कशा करतात, हे आता लपलेले नाही. (‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांचे गुप्त जाळे. या व्यवस्थेच्या द्वारे सरकारी धोरणे खासगी संस्थांना अनुकूल बनवली जातात.) जिहादी, साम्यवादी आणि ‘डीप स्टेट’ या आघाडीने बांगलादेशात अराजक माजवून तेथील सरकार उलथवले, हे आपण पाहिलेच आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळी भारतात हेच करण्याची योजना होती; पण प्रयत्न थोडक्यात फसला.

३. महाराष्ट्रात जातीयवादाचा वणवा पेटवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र हा भारताचा खङ्गहस्त असल्यामुळे भारताचे तुकडे करायचे, तर महाराष्ट्र आपल्या हातात पाहिजे, हे ओळखून महाराष्ट्रात जातीयवादाचा वणवा पेटवून, हिंदूंना विभाजित करण्यासह विकास ठप्प करून अराजक माजवण्याचा आणि राज्य गिळंकृत करण्याचा प्रयत्न चालू आहे. ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’, ही साम्यवाद्यांचाच अड्डा आहे. तरीही त्यांनी केलेल्या संशोधनाप्रमाणे ‘रोहिंग्या आणि बांगलादेशी यांना मोठ्या प्रमाणात आणून वसवले जात आहे. त्यामुळे मुंबईत वर्ष २०५० पर्यंत केवळ ५३ टक्के हिंदु शेष रहातील.’ ‘महाराष्ट्र विकास आघाडी’ला एकगठ्ठा पाठिंबा देण्यासाठी उलेमा बोर्डाने घातलेल्या अटी पाहिल्यास ५३ टक्के हाही आशावाद वाटावा, अशी परिस्थिती आहे.

४. संघटित होणे महत्त्वाचे !

म्हणून मी म्हणतो, ‘ही साधी निवडणूक नाही, तर ही लढाई आहे.’ देश, हिंदुत्व आणि महाराष्ट्र धर्म टिकणार कि नाही ? याचा निर्णय या लढाईतील जय-पराजयावर अवलंबून असणार आहे. आज परिस्थिती अशी आहे, ‘हिंदुत्व टिकले, तरच अस्तित्व टिकेल आणि भाजप सोडून इतर सर्व पक्ष हिंदुत्वाच्या मुळावर उठले आहेत.’ हिंदु धर्म ज्यांना संपवायचा आहे, त्यांचे पहिले लक्ष्य असते ब्राह्मण; कारण ब्राह्मणांनी नेहमीच देव, देश आणि धर्म यांना प्राधान्य दिले आहे. आजही कुठल्याही वैचारिक गोंधळाला थारा न देता याच तीनही गोष्टींना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे; कारण आपल्या माणसांविषयी काही तक्रारी असल्या, तरी कुणी स्वतःच्या जिवावर उठलेल्या मारेकर्‍यांना घरात घेत नाही ! त्यामुळे देव, देश आणि धर्म यांचा विध्वंस करू पहाणार्‍यांना ब्राह्मणांसह सर्व जाती-जमातींचे एकच उत्तर असले पाहिजे, ‘शपथ हिंदुत्वाची, शपथ छत्रपती शिवरायांची या मोक्याच्या वेळी आमची वज्रमूठ कुणीही मोडू शकणार नाही. ‘बटेंगे तो कटेंगे. एक रहेंगे तो सेफ रहेंगे. (विभाजित व्हाल, तर कापले जाऊ. संघटित राहू, तर सुरक्षित राहू.)’

– श्री. अभिजित जोग, ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे लेखक, पुणे. (१२.११.२०२४)

संपादकीय भूमिका

हिंदूंनी कुठल्याही वैचारिक गोंधळाला थारा न देता देव, देश आणि धर्म यांना प्राधान्य देणे नितांत आवश्यक !