आपल्याला पेलण्यासारखी असेल तेवढीच साधना गुरु सांगतात !
एका उच्च पदस्थ सरकारी अधिकार्याने श्रीमहाराजांकडून (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडून) नाम घेतले आणि तो मनापासून नाम घेऊ लागला. काही दिवसांनी त्याने तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचे विचार ऐकले. त्यांचा परिणाम होऊन या गृहस्थाचे नाम सुटले. नामस्मरणाविषयी त्याच्या मनात शंकांचे काहूर उठले. ते त्यांनी श्रीमहाराजांपाशी प्रांजळपणे मान्य केले. श्रीमहाराज म्हणाले, ‘माझ्या व्याख्यानास या’, असे आमंत्रण कृष्णमूर्तींनी तुम्हास दिले नव्हते. तुम्ही स्वतःहून त्यांच्या व्याख्यानास गेला. तेव्हा त्यांच्या व्याख्यानामुळे तुमच्या मनाचा गोंधळ उडाला यासाठी त्यांना दोष देता येणार नाही.
एक मुलगा नुकताच मॅट्रिकची (दहावीची) परीक्षा उत्तीर्ण झाला आणि त्याने महाविद्यालयाच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. एक दिवस केवळ कुतुहलाने तो स्वतःहून शेवटच्या, म्हणजे एम्.ए.च्या वर्गात जाऊन बसला. तेथे चाललेले तत्त्वज्ञान विषयावरील व्याख्यान ऐकून तो इतका भांबावून गेला की, आपल्या हातून महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण होणार नाही, असे त्याला वाटले. ही जशी त्याच्या मनाची स्थिती झाली, तशीच तुमची झालेली आहे. कृष्णमूर्ती सांगतात तो आहे ज्ञानमार्ग. तो पचनी पडायला मोठी योग्यता लागते. तरी त्यांच्याकडून जे ऐकले ते विसरून जाऊन निमूटपणे नाम घेण्यास लागावे. नामाने मनास शाश्वत समाधान निश्चित लाभेल, याची हमी मी घेतो. त्यांनी जे ज्ञान सांगितले ते मलाही सांगता आले असते; पण जो धडा पचनी पडणार नाही तो देण्यात अर्थ काय ? म्हणून तो दिलेला नाही.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक – ल.ग. मराठे)