Manipur Violence : मणीपूरमध्ये ३ मंत्री आणि ६ आमदार यांच्या घरांवर आक्रमणे !

इम्फाळ (मणीपूर) – जिरिबाम जिल्ह्यातून गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेल्या एक महिला आणि २ लहान मुले यांचे मृतदेह १५ नोव्हेंबरला सापडल्यानंतर मृतांना न्याय मिळण्याची मागणी करणार्‍या संतप्त निदर्शकांनी ३ मंत्री आणि ६ आमदार यांच्या निवासस्थानांना लक्ष्य केले. संतप्त जमावाने मंत्री सपम रंजन, मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचे जावई आणि भाजप आमदार आर्.के. इमो सिंग यांच्या घरांनाही लक्ष्य केले. रात्री उशिरा संतप्त जमाव मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या निवासस्थानीही पोचला. आंदोलकांना हटवण्यासाठी सुरक्षादलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार केला.  बिघडलेली परिस्थिती पहाता ५ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यासह ७ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

काही मंत्र्यांसह भाजपच्या १९ आमदारांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना हटवण्याची मागणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २-३ दिवसांत परिस्थिती आणखी बिघडल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.