Chhattisgarh Waqf Board : राज्यातील सर्व मशिदींना शुक्रवारच्या नमाजानंतरच्या भाषणात विषय मांडण्यासाठी घ्यावी लागणार वक्फ बोर्डाची संमती !
छत्तीसगड वक्फ बोर्डाचा आदेश
रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडमध्ये आता शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदींमध्ये होणार्या चर्चेवर आणि भाषणावर वक्फ बोर्ड लक्ष ठेवणार आहे. कोणत्या विषयावर चर्चा होणार ? आणि त्याची ओळ काय असेल ?, यांना आधी वक्फ बोर्डाची मान्यता लागेल. वक्फ बोर्डाच्या संमतीनंतरच मशिदीचे मौलाना संबंधित विषयावर बोलू शकतील. असे केल्याने शुक्रवारच्या भाषणावर लक्ष ठेवणारे छत्तीसगड हे देशातील पहिले राज्य ठरेल.
छत्तीसगडमधील सर्व मशिदी छत्तीसगड वक्फ बोर्डाच्या नियमांच्या अधीन आहेत. या व्यवस्थेअंतर्गत वक्फ बोर्डाच्या नव्या अध्यक्षांनी नवा आदेश प्रसारित केला आहे. यात म्हटले आहे की, शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीचे मौलाना एखाद्या विषयावर जे भाषण करतात, त्या भाषणाचा विषय प्रथम वक्फ बोर्डाकडून संमत करून घ्यावा लागेल.
मशिदीच्या अनुयायांचा व्हॉट्सप ग्रुप !
वक्फ बोर्डाने या व्यवस्थेसाठी राज्यातील सर्व मशिदींतील प्रमुखांचा व्हॉट्सप ग्रुप सिद्ध केला आहे. या ग्रुपमध्ये प्रत्येक मुतवल्लीला (मशिदीचा व्यवस्थापकाला) शुक्रवारच्या भाषणाचा विषय प्रसारित करावा लागणार आहे. विषयओळ प्रविष्ट करणे आवश्यक आहे. वक्फ बोर्डाकडून नियुक्त केलेला अधिकारी त्या विषयाची आणि ओळीची तपासणी करेल. त्याच्या संमतीनंतरच मौलाना (इस्लामचा अभ्यासक (विद्वान)) मशिदींमध्ये त्या विषयावर भाषण करू शकतील.
शहरातील प्रमुख मशिदी समित्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले आहेत. शहर काझी महंमद अली फारूकी म्हणाले की, मदरसे आणि मशिदी येथील नमाजपठणांच्या वेळा आणि उत्सव यांमध्ये वक्फ बोर्डाने हस्तक्षेप करणे अयोग्य आहे. वक्फ बोर्डाचा आदेश स्वीकारणे किंवा न स्वीकारणे, हे मशिदी समित्यांवर अवलंबून असेल.
आदेशाचे उल्लंघन केल्यावर गुन्हा नोंदवणार ! – वक्फ बोर्ड
वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सलीम राज म्हणाले की, बहुतेक भाषणे सामाजिक असतात; परंतु काही भाषणे भावनिक आणि चिथावणी देणारी असतात. काँग्रेस सरकारच्या काळात, शुक्रवारच्या नमाजपठणानंतरच्या प्रवचनानंतर कवर्धा येथे दंगलही उसळली होती. नवीन सूचना आणि व्यवस्था यांची माहिती राज्यातील सर्व मुतवल्लींना देण्यात आली आहेे. पुढील शुक्रवारपासून त्याची कार्यवाही (अंमलबजावणी) करण्यासही सांगण्यात आले आहे. भाषणे राजकीय नव्हे, तर सामाजिक सलोख्याला चालना देणारी हवी. आमच्या सूचनांचे पालन न केल्यासाठी मुतवल्ली आणि मौलाना यांच्याविरोधात गुन्हाहीदेखील नोंदवला जाऊ शकतो; कारण वक्फ बोर्डाला कायद्यानेही तसे करण्याचा अधिकार दिला आहे.
संपादकीय भूमिकामुळात प्रत्येक मशिदींमध्ये केल्या जाणार्या भाषणांवर स्थानिक पोलिसांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे ! इतकेच नाही, तर या ठिकाणी दिवसभरात घडणार्या गोष्टींवरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसे केल्यासच येथे हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर होणारी आक्रमणे थांबतील ! |