कोकण आणि महाराष्ट्र यांच्या विकासासाठी महायुतीला विजयी करा !

  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

  • दीपक केसरकर, नितेश राणे आणि नीलेश राणे यांचा विजय नक्की !

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सावंतवाडी – केंद्रात महायुतीचे सरकार आहे, तसेच राज्यातही महायुतीचे सरकार आले की, विकासाला वेग येईल. त्यामुळे धनुष्यबाण किंवा कमळ या निशाणीवर जेथे जेथे महायुतीचे उमेदवार असतील, त्या सर्वांना विजयी करा. महायुती सरकारने विकास आणि कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्यांची चांगली सांगड घातली. कोकणाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. येथील तरुणांना नोकरी-व्यवसायासाठी मुंबई, पुणे आदी ठिकाणी जावे लागू नये, असा आमचा प्रयत्न आहे. कोकण हे निसर्गाने समृद्ध आणि नटलेले आहे. त्यामुळे पर्यटनाला येथे मोठी संधी आहे. हे पहाता पर्यटनाला चालना देण्याचे काम केले जाईल. लोकसभेत महाविकास आघाडीला कोकणात एकही जागा मिळाली नाही. तीच स्थिती या निवडणुकीत असेल. कोकणसह महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीला विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे आयोजित सभेत केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या मतदारसंघांतील अनुक्रमे नितेश राणे, नीलेश राणे आणि दीपक केसरकर या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सावंतवाडी येथे ही सार्वजनिक सभा घेण्यात आली. या वेळी खासदार नारायण राणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री – लाडकी बहीण योजना चालू केल्यावर विरोधकांना पोटशूळ उठला. ही योजना बंद होणार नाही. ती निवडणुकीपुरती चालू केलेली नाही; मात्र विरोधकांनी ती बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले. आमचे सरकार आले की, या योजनेतील निधीत वाढ केली जाईल. प्रत्येकाला अन्न, वस्त्र आणि निवारा देण्याचा महायुतीचा मानस आहे. विरोधक आमच्या योजना बंद करण्याचे सांगत आहेत, तर ते चालू काय करणार ? हे त्यांनी सांगावे. ज्यांनी ‘लाडकी बहीण योजने’ला विरोध केला, त्यांना २० नोव्हेंबरला मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवा. केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा राज्याला २ लाख कोटी दिले होते; मात्र मोदी सरकारने १० लाख कोटी रुपये दिले. आम्ही देहलीत जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना आणण्यासाठी जातो. आमच्या स्वार्थासाठी जात नाही.’’

दीपक केसरकर मॅच जिंकून देणारे ऑलराऊंडर !

या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘केसरकर हे शांत आणि संयमी नेतृत्व आहे. त्यांनी पक्षासाठी चांगली भूमिका बजावली आहे. त्यांना जे जे काम दिले, ते ते चांगल्या प्रकारे केले. केसरकर यांना चक्रव्युहात लढण्याची सवय आहे; परंतु त्यांचा अभिमन्यू होत नाही; कारण चक्रव्यूह कसा भेदायचा, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. ते अष्टपैलू (ऑलराऊंडर) असल्याने सामना (मॅच) जिंकूनच देतात, हे नक्की आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणुकीत कुणीही असो, ते निवडणूक जिंकल्याविना रहाणार नाहीत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी सांगितले.