ज्ञानप्राप्तकर्ता साधक श्री. राम होनप यांना सौ. मधुरा कर्वे यांनी विचारलेला प्रश्न

श्री. राम होनप

प्रश्न

‘विभूती क्र. १’ मध्ये (नकारात्मक स्पंदने असलेल्या विभूतीमध्ये) सकारात्मक ऊर्जा काहीच नसून नकारात्मक ऊर्जा आहे. या विभूतीचे सर्वांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले, तसेच तो परिणाम १ घंटा टिकून होता. असे असूनही प्रयोगातील व्यक्ती आणि बालसंत यांना मात्र या विभूतीच्या संदर्भात चांगल्या अनुभूती आल्या आहेत. याचे कारण काय ?

सौ. मधुरा कर्वे

उत्तर

विभूतीत नकारात्मक स्पंदने असूनही प्रयोगातील व्यक्ती आणि बालसंत यांना विभूतीच्या संदर्भात चांगल्या अनुभूती येण्यामागील कारणे

१. ‘प्रयोगाच्या वेळी प्रयोगातील व्यक्ती आणि बालसंत यांचा विभूतीविषयी ‘विभूती देव किंवा गुरु यांची आहे’, असा भाव होता. साधना करणार्‍या जिवांवर प्रत्येक गोष्टीत देव किंवा गुरु पहाण्याचा संस्कार झालेला असतो. त्यानुरूप ते कृती करत असतात. अशा प्रसंगी ‘ती विभूती चांगली कि वाईट ?’, असा विचार न करता ते त्याविषयी भाव किंवा श्रद्धा ठेवून ती ग्रहण करत असतात. तेव्हा त्यांचा जीवात्मा भगवंताच्या अनुसंधानात असतो. परिणामी त्यांच्यावर नकारात्मक स्पंदने असलेल्या विभूतीचा परिणाम होत असला, तरी अशा जिवांना चांगल्या अनुभूती येतात.

२. नकारात्मक स्पंदने असलेल्या विभूतीविषयी भाव किंवा श्रद्धा ठेवून ती ग्रहण केल्याने तिच्यातील नकारात्मक स्पंदनांचा परिणाम व्यक्तीचे शरीर आणि मन येथपर्यंत पोचतो; मात्र तिच्या अंतर्मनावर परिणाम होत नाही; कारण तिचे अंतर्मन भगवंताच्या स्मरणात असते. याउलट भाव न ठेवता नकारात्मक विभूती ग्रहण केल्यास तिच्यातील नकारात्मक स्पंदनाचा दुष्परिणाम व्यक्तीचे शरीर, मन आणि अंतर्मन यांवर होत असतो.

३. व्यक्तीला ‘विभूती चांगली किंवा त्रासदायक आहे ?’, हे ओळखता येत नसल्यास तिने ती नामजपासहित किंवा भावपूर्णरित्या ग्रहण केल्यास विभूतीतील नकारात्मक स्पंदनांचा दुष्परिणाम न्यून होतो आणि विभूतीत सकारात्मक स्पंदने असल्यास व्यक्तीला तिचा पुष्कळ आध्यात्मिक लाभ होतो.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.९.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक