हिंदु राष्ट्र समन्वय समितीची संकल्पना आणि आवश्यकता !

‘सध्या देशात हिंदूंवर विविध आक्रमणे होत आहेत. आज हिंदूंवर जे भयावह संकट आले आहे, तसे संकट भूतकाळातही आले नव्हते. ८०० ते १ सहस्र वर्षांपर्यंत इस्लामने आमच्यावर राज्य केले; परंतु संपूर्ण भारत वर्षावर ते कधीही राज्य करू शकले नाहीत. ते जेव्हा आमच्यावर आक्रमण करत होते, तेव्हा आमच्याकडे संघटनाची एक शक्ती होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आम्ही एकत्रितपणे लढायला उभे रहात होतो. राजा, प्रजा, ज्ञानी आणि पंडित सर्वजण एकत्र येऊन शत्रूविरुद्ध उभे रहात होते. आज ते संपूर्णपणे विभाजित झाले आहेत. त्यामागे धर्मनिरपेक्षता आणि आरक्षण ही दोन कारणे आहेत, जे पूर्वी नव्हते.

दुसरी गोष्ट आहे की, त्या वेळी लोक शस्त्र उचलत होते. सत्यासाठी ते उचलण्यास कुणी थांबवत नव्हते. आज आपण शस्त्र उचलले, तर आपल्याला ‘हिंदु आतंकवादी’ म्हटले जाते. खरे पहाता आपल्या राज्यघटनेत आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी आपण शस्त्र हातात घेऊ शकतो; परंतु सरकार त्याला अनुमती देत नाही. आपल्या देशात अशी स्थिती झाली आहे की, आक्रमण करणारा आणि पीडित यांना एकाच श्रेणीत धरले जाते. एखाद्या ठिकाणी दंगल झाली, तर दंगल घडवणार्‍या ५ धर्मांध मुसलमानांना अटक केली जातेच; पण संतुलन राखण्यासाठी १० निरपराध हिंदूंनाही अटक केली जाते. आपण बौद्धीक स्तरावरही लढू शकत नाही. आपण काही बोललो, तर ते द्वेषमूलक वक्तव्य (हेट स्पीच) समजले जाते. 

डॉ. नील माधव दास यांचा परिचय

धनबाद (झारखंड) येथील डॉ. नील माधव दास हे ‘तरुण हिंदू’ संघटनेचे संस्थापक आहेत. ही संघटना हिंदूंमध्ये धर्मचेतना जागृत करून त्यांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रेरित करते, तसेच धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांच्या विरोधात जागृती करते. या संघटनेचे ‘तरुण हिंदू’ नावाचे वर्तमानपत्रही प्रकाशित होते.

१. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या ख्रिस्तीकरणात वाढ

सर्वाेच्च न्यायालय म्हणते की, कुणी प्रक्षोभक बोलले, तर न्यायालयाने त्यावर स्वतःहून कारवाई (‘स्यूमोटो’ याचिका) केली पाहिजे. ख्रिस्ती आणि इंग्रज यांनी कोणतेही मंदिर तोडले नाही किंवा कोणतेही मंदिर लुटले नाही. आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मंदिरांची तोडफोड होत आहे. कायदा बनवून हिंदूंची मंदिरे राजरोस लुटली जात आहेत. आज नागालँड हे राज्य देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच १०० टक्के ख्रिस्ती बनले आहे. त्यापूर्वी भारतीय ख्रिस्ती झाले नव्हते. इंग्रज किंवा ख्रिस्ती यांनी हिंदूंना ख्रिस्ती बनवले नव्हते. त्यांनी कधीही भारतात पोपला आमंत्रण दिले नव्हते. आपल्या लोकांची अशी कोणती लाचारी आहे की, आपण पोपला जाऊन बोलावून आणत आहोत. पोपही येथे येऊन आपल्याच देशात उघडपणे म्हणतो, ‘आम्ही भारताला ख्रिस्ती देश बनवू.’ आज आपलेच सरकार आपल्या विरुद्ध कार्य करत आहे. आज आधुनिकीकरणामुळे हिंदु धर्माच्या विरोधात इंग्लंड आणि अमेरिका येथे बसून खोटे कथानक (नॅरेटिव्ह) रचणे अधिकच सोपे झाले आहे. त्यामुळे आज हिंदु समाज अत्यंत संकटात आहे.

डॉ. नील माधव दास

२. हिंदूंना अल्पसंख्यांक करणे, हेच देश-विदेशी शक्तींचे ध्येय !

आज भारताच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे शत्रू आहेत. अरब देशापासून मलेशियापर्यंत सर्व लोक यातच व्यस्त आहेत की, भारतातील हिंदूंचे बहुमत कशा प्रकारे न्यून करता येईल. ते लोक भारताला ‘गजवा-ए-हिंद’ (काफिरांना ठार करण्यासाठीचे युद्ध) करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे भारताला ‘ख्रिस्ती राष्ट्र’ कसे बनवता येईल, यासाठी ख्रिस्ती देश, ख्रिस्ती प्रचारक आणि त्यांचे पोपही प्रयत्नशील आहेत. अशा प्रकारे ख्रिस्ती आणि इस्लाम दोघेही विविध प्रकारे हिंदूंचे बहुमत न्यून करून येथे त्यांचे राज्य आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारताच्या दृष्टीने पाहिले, तर ते दोघेही एका ‘इकोसिस्टम’चे (यंत्रणेचे) भाग आहेत.

खलिस्तानी संघटना परत पुनर्जिवित झाल्या आहेत. ‘बीबीसी’, ‘अल् जजिरा’ यांसारख्या वृत्तसंस्था हिंदूंविरुद्ध खोटी कथानके रचण्यात व्यस्त आहेत. ‘फोर्ड फाऊंडेशन’, हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन (डिस्मेंटलिंग हिंदुत्व) परिषद, सर्व बुद्धीजीवी लोक, बहुतांश नट-नट्या, सामाजिक कार्यकर्ते हेही हेच कार्य करत आहेत. भारतामधील सर्व राजकीय पक्ष मुसलमानधार्जिणे आहेत. त्यामुळे मुसलमानधार्जिणे होण्यासाठी त्यांना हिंदूंविरोधी बनावेच लागते. हे पक्ष केवळ मुसलमानधार्जिणेच नाहीत, तर ख्रिस्तीधार्जिणेही आहेत. अनेक राज्य सरकारे, साम्यवादी संघटना, शहरी नक्षलवादी, सारे बुद्धीजीवी हेही हिंदुविरोधीच कार्य करत आहेत. कर्नाटकमध्ये हिंदुविरोधी सरकार आल्यानंतर धर्मांतरविरोधी कायदा त्वरित रहित करण्यात आला. ‘हिंदूंना अल्पसंख्यांक करणे’, हेच या सर्वांचे ध्येय आहे.

३. राजकीय, सामरिक, आर्थिक आणि सामाजिक शक्तींच्या अभावी हिंदू दुर्बल

कोणत्याही समाजाच्या उन्नतीसाठी ४ शक्तींची आवश्यकता असते.

अ. पहिली शक्ती राजकीय शक्ती, जी हिंदूंकडे नाही. कोणताही राजकीय पक्ष आपल्याला साहाय्य करण्यास सिद्ध नाही.

आ. दुसरी आहे सामरिक (सैन्य) शक्ती ! आपल्याला पोलीस आणि सैन्य यांचे सहकार्य नाही. हिंदु बांधव कधीही आतंकवादी होऊ शकत नाहीत. आपले शास्त्र आपल्याला आतंकवादी होण्यासाठी कधी सांगतच नाही. शास्त्राने राजा, क्षत्रिय आणि देवता यांनाच शस्त्र उचलायला सांगितले आहे. त्यानंतर आपल्या शास्त्रांत सर्वांना अहिंसा शिकवण्यात आली आहे. उदा. आपल्या लोकांच्या यम-नियमांमध्ये कुठेही असे सांगितले नाही किंवा भगवद्गीतेतील १६ व्या अध्यायात जे २६ दैवी गुण शिकवले आहेत, त्यामध्ये कुठेही शस्त्र उचलण्याचा आदेश आपल्याकडे नाही. आपल्या यम-नियमांचा आरंभ अहिंसेपासूनच चालू झाला आहे.

अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमाः ।

अर्थ : अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे ५ यम होत.

शौचसन्तोषतपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमाः ।

– पातञ्जलयोगदर्शन, साधनपाद, सूत्र ३० आणि ३२

अर्थ : शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान हे नियम होत.

हे जे १० नियम आपल्याला सांगितले आहेत, त्यात कुठेही शस्त्र उचलायचे नाही.

इ. नंतर येते आर्थिक शक्ती. आपल्या लोकांकडे आर्थिक शक्तीही नाही. लोक मंदिरात जातात. कोट्यवधी रुपयांचे दान करतात; हिंदुत्वाची लढाई लढण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना दान म्हणून पैसे देणारेही कुणी नाहीत.

ई. त्यानंतर चौथी शक्ती, म्हणजे सामाजिक शक्ती असते. जी कोणत्याही उन्नतीसाठी आवश्यक असते. तो समाजही आपल्या समवेत नाही. हिंदुत्वाविषयी अनेक खोटी कथानके समाजात बिंबवली आहेत. आज हिंदुत्वाविषयी बोलायला लागलो, तर समाज थोडेतरी ऐकून घेतो. वर्ष १९९८ च्या पूर्वी हिंदुत्व किंवा हिंदु राष्ट्र यांविषयी बोललो, तर ‘तुम्ही हिंदु-मुसलमान यांच्यात भांडण लावायचा प्रयत्न करत आहात’, असे लोक म्हणायचे. आता तो समाज हळूहळू आपल्याकडे येत आहे. हा समाज संघटित रूपाने आपल्या समवेत आला, तर अन्यायाच्या विरोधात लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू शकतो. आज समाजाचा मोठा वर्ग शहरी नक्षलवादी, बुद्धीवादी, साम्यवादी आहे, जे देशविरोधी आहेत. ऑस्ट्रेलियाचे प्रा. साल्वाटोर बाबोन्स यांनी म्हटले आहे, ‘भारताचे बुद्धीवादी हे राष्ट्रविरोधी आहेत.’

४. धर्मनिरपेक्षतेमुळे देशातील सुशिक्षित लोक हिंदुत्वापासून लांब

देशातील सुशिक्षित लोकांना धर्मनिरपेक्षतेने हिंदुविरोधी केले आहे. त्यामुळे समाजाला आपण एकत्र कसे आणणार ?, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. देशात अनेक हिंदु संघटना आहेत. त्यांची नेमकी संख्या किती आहे, हे आपल्यालाही ठाऊक नाही. देशात सहस्रो हिंदु संघटना असतील; पण जेव्हा हिंदूंवरील आघाताच्या विरोधात आपण रस्त्यावर उतरतो, तेव्हा त्यातील किती लोक घराबाहेर निघतात ? हिंदूंच्या या असंघटितपणामुळे पोलीस, प्रशासन आणि सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात.

५. हिंदु राष्ट्र समन्वय समितीची संरचना

अ. धनबादमध्ये (झारखंड) आम्ही ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ या नावाने एक संस्था बनवली आहे. त्यात विविध संघटनांना एकत्रित केले आहे. या संस्थेच्या अंतर्गत काही कार्यक्रमही आयोजित केले आहेत. विविध संघटना मिळून बनवलेल्या या संस्थेचा एक अध्यक्ष असेल. या संस्थेचे मुख्य कार्यालय असेल. या संस्थेच्या राज्य आणि जिल्हा स्तरांवर शाखा स्थापन होऊ शकतात. त्यानंतर गावानुसार समित्या बनवल्या जातील. त्या समितीची साप्ताहिक बैठक होईल. या बैठकीच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. यापद्धतीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयीचे विचार समाजात पोचवले जातील.

आ. संस्थेच्या अध्यक्षांच्या साहाय्याला एक कार्यकारिणी समिती, एक सल्लागार मंडळ आणि एक मतदार असेल. संपूर्ण भारतात एक मतदार समिती राहील, जी २ वर्षांतून एकदा अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना निवडून देईल. या समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावातील अन्य पंथियांची लोकसंख्या, धर्मांतरितांची संख्या, ख्रिस्ती प्रचारकांची संख्या, या सर्वांना बाहेरून मिळणारे आर्थिक साहाय्य इत्यादी माहिती गोळा करता येईल. आपल्याकडे लोकांची विराट शक्ती असेल, तर सरकारही आपल्याला महत्त्व देईल.

इ. समितीचा अधिवक्त्यांचा गट असेल. हा गट निरपराध हिंदु कार्यकर्त्यांला अटक झाली, तर त्याला न्यायालयीन साहाय्य करील. आपल्या लोकांचा एक केंद्रीय निधी असेल. जो सहभागी संस्थांच्या माध्यमातून गोळा होईल. या समितीमुळे निवडणुकीच्या काळात मतदानाविषयीचा संदेश सर्व गावांच्या शाखेत पोचू शकेल. याचा राजकीय पक्ष होता कामा नये. या संस्थेतील सर्व पदाधिकारी संपूर्णत: निःस्वार्थी आणि भ्रष्टाचारविरहित असतील. यात काम करणार्‍यांकडे निष्ठा, निपुणता आणि समर्पण या गुणांची उपलब्धता आवश्यक समजली जाईल.’

– डॉ. नील माधव दास, संस्थापक, ‘तरुण हिंदू’, झारखंड.