श्री. रामचंद्र शेळके यांना कोरोना झाल्यावर त्यांनी अनुभवलेली अपार गुरुकृपा !
‘एप्रिल २०२१ मध्ये कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेत मला (सौ. शुभांगी रामचंद्र शेळके) आणि माझे यजमान श्री. रामचंद्र शेळके यांना कोरोना झाला. आम्हा दोघांना शासकीय रुग्णालयात भरती केले गेले. माझी स्थिती ४ दिवसांत नियंत्रणात आली. त्यामुळे मला घरी पाठवले; परंतु माझ्या यजमानांची (श्री. रामचंद्र शेळके, वय ६७ वर्षे) प्रकृती गंभीर झाली होती. केवळ गुरुकृपेमुळेच ते मृत्यूच्या दारातून परत येऊ शकले. या संपूर्ण कालावधीत मला पदोपदी शिकायला मिळालेली सूत्रे, अनुभवलेली अपार गुरुकृपा आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. यजमानांची स्थिती गंभीर असतांना अनुभवलेली गुरुकृपा !
१ अ. ‘यजमानांना प्राणवायूचा पुरवठा करणारे यंत्र व्यवस्थित कार्यरत नाही’, असे गुरुमाऊलींच्या कृपेने लक्षात येणे आणि यजमान रुग्णाईत असतांना सतत सतर्क रहाता येणे : २ दिवसांनी यजमानांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे मला त्यांच्यासाठी पुन्हा रुग्णालयात जावे लागले. त्यांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण ७५ एवढे न्यून झाले होते. (सामान्य व्यक्तीच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण ९६ ते १०० असते.) ‘त्यांना प्राणवायूचा पुरवठा करणारे यंत्र व्यवस्थित कार्य करत नाही’, असे गुरुमाऊलीच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने माझ्या लक्षात आले. मी तेथील आधुनिक वैद्यांना सांगून लगेचच त्यांचा पलंग पालटून घेतला. त्यामुळे देवाच्या कृपेने त्यांना प्राणवायूचा पुरवठा व्यवस्थित होऊ लागला.
१ आ. ‘ऑक्सिजन-बेड’ची प्रचंड उणीव असतांनाही केवळ देवाच्या कृपेनेच यजमानांना दुसर्या शासकीय रुग्णालयात एक पलंग उपलब्ध होणे : माझ्या यजमानांना १५ लीटर प्राणवायूची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे त्यांना ज्या रुग्णालयात हा पुरवठा होऊ शकेल, तेथे तातडीने हालवणे आवश्यक झाले; पण तेव्हा गोव्यातील कुठल्याही रुग्णालयात एकही ‘ऑक्सिजन-बेड’ (प्राणवायूचा पुरवठा करणारे यंत्र लावू शकतो, असा पलंग) उपलब्ध नव्हता. अनेक प्रयत्नांनंतर आम्हाला ‘ एका शासकीय रुग्णालयात ‘एक पलंग मिळू शकतो’, असे कळले. त्यानंतर माझ्या यजमानांना शासकीय रुग्णालयातून अत्यंत तातडीने दुसर्या शासकीय रुग्णालयात हालवण्यात आले. केवळ देवाच्या कृपेनेच यजमानांना शासकीय रुग्णालयात पलंग मिळाला.
२. भित्र्या स्वभावामुळे मृत्यूच्या केवळ वृत्तामुळेही घाबरून आजारपण येत असणे, त्यामुळे यजमान रुग्णालयात भरती असतांना तेथील परिस्थिती पाहून प्रकृती बिघडणे
माझी प्रकृती तशी पुष्कळ भित्री आहे. यजमान रुग्णालयात भरती असतांना सतत कुठून तरी मृत्यूरुदनाचा आवाज कानावर पडत असे. हे तिथे सामान्यच झाले होते. माझे यजमान ज्या कक्षात होते, तिथे सर्वच गंभीर रुग्ण होते. प्रत्येक दिवशी १ – २ रुग्ण तडफडून दगावतांना मी पहात होते. तिथेच त्या रुग्णाचे प्रेत प्लास्टिकमध्ये गुंडाळले जात होते. ही परिस्थिती पाहून मला उलट्या आणि जुलाब होऊ लागले. मी तेथील आधुनिक वैद्यांकडून औषध घेतले होते आणि नामजपादी उपायही करत होते; मात्र २ दिवसांच्या सततच्या जुलाबांमुळे मी गळून गेले होते. ‘आता पुढे कसे होणार ?’ हे मला कळत नव्हते.
३. सनातनचे साधक, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी दिलेले आध्यात्मिक नाती असलेले कुटुंब !
३ अ. यजमानांच्याच कक्षात एका साधकाच्या साहाय्याला आलेल्या कु. मनीषा राऊत यांनी केलेले साहाय्य ! : मी गळून गेलेल्या अवस्थेत त्याच कक्षात एका साधक रुग्णाच्या सेवेत असलेल्या सनातनच्या साधिका कु. मनीषा राऊत हिच्याकडे गेले. तिने मला सरबत देऊन तिच्या चटईवर झोपायला सांगितले आणि स्वतः बसून राहिली. मी पहाटे उठल्यावर पाहिले, तर मनीषा एका आसंदीवर बसूनच झोपली होती. तिने मला तिची झोपण्याची जागा देऊन स्वतः रात्रभर बसून राहिली होती. तिने जवळच असलेल्या माझ्या यजमानांचीही काळजी घेतली होती. गुरुमाऊलीने आम्हा साधकांना असे आध्यात्मिक नाती असलेले एकमेकांची काळजी घेणारे सनातनचे कुटुंब दिले आहे.
३ आ. साहाय्य मिळण्याच्या दृष्टीने संपर्क करतांना गुरुकृपेने ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक शानभाग यांना संपर्क होणे आणि तेव्हा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याशी बोलणे झाल्यामुळे त्यांच्या दैवी वाणीतून चैतन्य मिळणे : त्यानंतर साहाय्य मिळण्याच्या दृष्टीने मी अनेक संपर्क केले; पण रुग्णालयात भ्रमणभाषला ‘रेंज’ न मिळाल्याने कुणाचाही संपर्क होत नव्हता आणि माझ्यात खालच्या माळ्यावर जाऊन दूरभाष करण्याचेही त्राण नव्हते. प्रत्यक्षात मला कुणाचे साहाय्य मिळणे कठीणच होते; कारण कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच साहाय्याला येऊ शकत होत्या. गुरुकृपेने ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक शानभाग यांचा भ्रमणभाष लागला. त्यांच्या भ्रमणभाषवर मी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना माझी सर्व स्थिती सांगितली. मला त्यांच्या दैवी वाणीतून चैतन्य मिळाले आणि तेच माझ्यासाठी पराकोटीचे साहाय्यक अन् ऊर्जादायक ठरले. त्यामुळे मी पुन्हा उभी राहू शकले.’ (क्रमशः)
– सौ. शुभांगी रामचंद्र शेळके, फोंडा, गोवा. (२५.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |