छत्रपती संभाजीनगर येथे ‘रॅडिको’ आस्थापनात मक्याचा टँक फुटून ४ कामगार ठार !
छत्रपती संभाजीनगर – मद्यनिर्मितीसाठी आवश्यक मका साठवून ठेवलेली मोठी टाकी अचानक फुटल्याने मक्याच्या ढिगार्याखाली दबून ४ कामगार ठार झाले आहेत. शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रॅडिको आस्थापनात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
घटनास्थळी मोठे जेसीबी आणि पोकलेन यांद्वारे मक्याचा ढिगारा बाजूला करून कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. या ढिगार्याखाली आणखी काही कामगार दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किसन हिरडे (वय ४५ वर्षे), दत्तात्रेय बोदरे (वय ३५ वर्षे), विजय गवळी (वय ४५ वर्षे) आणि संतोष पोपळघट (वय ३५ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
मक्याची साठवणूक करण्यासाठी लोखंड आणि ॲल्युमिनियम यांपासून सिद्ध केलेल्या ३ सहस्र मे. टनाच्या टाकीचे आयुष्य २५ वर्षांचे असते; मात्र रॅडिको आस्थापनातील ही टाकी अवघ्या १५ वर्षांतच फुटली. याविषयी अधिकची माहिती देण्यास प्रकल्प (प्लांट हेड) आशिष कपूर यांनी टाळाटाळ केली. खासदार कल्याण काळे यांनीही माहिती दिली नाही. किती कामगार काम करतात ? हेही त्यांना सांगता आले नाही.