India Road Accidents 2023 : शिरस्त्राण न घातल्याने वर्ष २०२३ मध्ये देशातील रस्ते अपघातांत ५४ सहस्र ५६८ लोकांचा मृत्यू
नवी देहली – रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या भारतातील रस्ते अपघात-२०२३ अहवालासाठी गोळा केलेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०२३ मध्ये १८ वर्षांखालील ९ सहस्र ४८९ मुले रस्ते अपघातात मरण पावली. सरासरी प्रतिदिन २६ मुलांचा मृत्यू झाल्याचे यातून लक्षात येते. वर्षभरात अपघातात जीव गमावलेल्या एकूण लोकांपैकी हे प्रमाण ५.४९ टक्के आहे. यांपैकी २ सहस्र ५३७ मुले वाहन चालवतांना (परवाना नसतांना) मरण पावली. अपघातांमध्ये ४ सहस्र २४२ मुले प्रवासी म्हणून मरण पावली, तर २ सहस्र२३२ मुले पायी चालतांना रस्त्यावर अपघातात मृत्यूमुखी पडली. या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये शिरस्त्राण न घातल्याने ५४ सहस्र ५६८ जणांचा मृत्यू झाला.
१. वर्ष २०२२ च्या तुलनेत रस्ते अपघातात बालकांच्या मृत्यूची संख्या ३९ आहे. यावर्षी ९ सहस्र ५२८ मुलांनी रस्ते अपघातात जीव गमावला.
२. देशात अजूनही प्रत्येक घंट्याला सरासरी ५५ रस्ते अपघात होत आहेत. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला.
३. देशात सर्वाधिक १३.७ टक्के मृत्यू उत्तरप्रदेशात झाले आणि तमिळनाडू सलग सहाव्या वर्षी रस्ते अपघातांच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर आहे.
४. २०२३ या वर्षातील रस्ते अपघातांच्या आकडेवारीकडे वयानुसार पाहिले, तर सर्वाधिक ६६.४ टक्के मृत्यू हे १८ ते ४५ या वयोगटातील आहेत. एकूण मृत्यूंपैकी ५०.५ टक्के व्यक्ती ३५ वर्षाखालील आहेत.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वर्षभरात १६ टक्के वाढले !रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वर्षभरात १६ टक्क्यांनी वाढले आहे. वर्षभरात २ सहस्र १६१ लोकांनी खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात जीव गमावला, जो २०२२ (१ सहस्र ८५६) पेक्षा १६.४ टक्के अधिक आहे. |