विमा प्रतिनिधींनी पैशांची मागणी केल्यास शेतकर्यांनी तक्रार द्यावी ! – भाग्यश्री फरांदे, जिल्हा कृषी अधीक्षक
सातारा, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळते; मात्र फळपिकांचे अपेक्षित उत्पन्न न झाल्यास हानीही मोठी होते. हे विचारात घेऊन शेतकर्यांच्या फळ पिकांना हवामानाच्या धोक्यांपासून विमा संरक्षण देऊन त्यांचे आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी ‘फळपीक विमा योजना’ राबवण्यात येत आहे. विमा आस्थापन प्रतिनिधी पडताळणी करण्यासाठी आल्यास संबंधित शेतकर्यांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, तसेच विमा प्रतिनिधींनी पैशांची मागणी केल्यास तात्काळ तक्रार द्यावी. अशी विमा आस्थापने आणि प्रतिनिधी यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी दिली. (कृषी विभागाने शेतकर्यांना सांगण्यासह स्वत:हून अशा खोट्या आस्थापनांवर कारवाई करणे अपेक्षित ! – संपादक)
भाग्यश्री फरांदे म्हणाल्या की, या योजनेअंतर्गत ३ वर्षांमध्ये अनुमाने २९ सहस्र बनावट अर्ज आढळून आले आहेत. त्या अनुषंगाने राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव यांनी फळपीक विमा योजनेचा लाभ घेणार्या शेतकर्यांच्या फळबागांची पहाणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील बागांची पडताळणी कृषी विभागाच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे.