सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे पाटीदार समाजातील ‘महिलांसाठी साधना आणि स्वसंरक्षण’ या विषयावर मार्गदर्शन पार पडले !
सावंतवाडी – ‘दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश पाटीदार समाज’, यांच्या अंतर्गत ‘सावंतवाडी पाटीदार समाज’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पाटीदार समाज सभागृहात एक दिवसाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या सकाळच्या सत्रात ‘आनंदी जीवनासाठी साधना’, या विषयावर व्याख्यान आणि दुसर्या सत्रात ‘नारीशक्ती’ उपक्रमाच्या अंतर्गत महिलांसाठी स्वसंरक्षणाविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात समितीच्या वतीने श्री. शरद राऊळ यांनी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ आणि कु. प्रतीक्षा परब यांनी ‘स्वसंरक्षण काळाची आवश्यकता’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात मालवण, वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी आणि दोडामार्ग येथील पाटीदार समाजाच्या ८० हून अधिक युवती अन् महिला उपस्थित होत्या. या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन उपस्थितांनी ‘प्रत्येक मासात एका रविवारी साधनेविषयी मार्गदर्शन आणि स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग चालू करा’, अशी मागणी केली.