हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या जिल्हा संयोजकांच्या शिबिराचा गोव्यात शुभारंभ !
फोंडा (गोवा) – येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने समितीच्या जिल्हा संयोजकांच्या ३ दिवसांच्या शिबिराचा शुभारंभ झाला. यामध्ये महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील विविध जिल्ह्यांत कार्य करणारे समितीचे जिल्हा संयोजक, तसेच सदस्य सहभागी झाले आहेत. या वेळी समितीचा उद्देश, त्या माध्यमातून हिंदूसंघटन आणि हिंदूंची इकोसिस्टम (यंत्रणा) सिद्ध करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न झाले पाहिजे, यावर शिबिरार्थी हिंदुत्वनिष्ठांचे दिशादर्शन करण्यात येत आहे. या वेळी शिबिरार्थींनी तळमळीने कार्य केल्याने विविध क्षेत्रांत त्यांना यश कशा प्रकारे लाभले, याविषयी त्यांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या अनुभवांची देवाण-घेवाणही केली.
शिबिरामध्ये हिंदु राष्ट्राची संकल्पना, हिंदु राष्ट्राविषयी हिंदुद्वेष्ट्यांकडून घेतले जाणारे आक्षेप आणि त्यांचे प्रभावीपणे खंडण कसे करावे, हिंदुत्व कार्याची व्याप्ती, हिंदुत्वाचे आदर्श पद्धतीने कार्य करण्यासंबंधीची आचारसंहिता अन् तिचे पालन केल्याने होणारे लाभ या विषयांवर उपस्थितांचे दिशादर्शन करण्यात आले. यासमवेतच हिंदूसंघटनाचे कार्य करत असतांना साधना केल्याने काय लाभ होतात, याविषयीही उपस्थित शिबिरार्थींना मार्गदर्शन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनीही हिंदु राष्ट्रासंबंधीच्या विषयावर मार्गदर्शन केले.