महाराष्ट्रात प्रथमच सव्वा लाख तुलसी अर्चना सोहळा पार पडला !

१६१ दांपत्यांचा सहभाग

सोहळ्याचे उद्घाटन करताना दांपत्य

अहिल्यानगर – येथील माहेश्वरी समाजातील राधाकृष्ण परिवाराने खाकीदास मठाच्या प्रांगणात कार्तिक एकादशीचे औचित्य साधून येथे सव्वा लाख तुलसी अर्चन सोहळा महाराष्ट्रात प्रथमच साजरा केला. या सोहळ्यासाठी पंढरपूर येथून तुळशीची पाने मागवण्यात आली होती.

सोहळ्याचे यजमानपद मोहनलालजी परागजी मानधना, रितेशजी जुगलकिशोरजी मालणी आणि युगलजी बाळकिसनजी भुतडा यांनी भूषवले. पंडित विजय दधीच महाराज (विशाखापट्टणम्) यांनी पौरोहित्य केले. १६१ दांपत्यांनी या ऐतिहासिक सोहळ्यात सहभाग घेतला होता. तुलसी पूजन आणि तुलसी अर्चन चालू असतांना पं. विजय दधीच महाराज यांच्या अमृतवाणीमधून होणारे मंत्रोच्चार वातावरण भारावून टाकणारे ठरले. कार्तिक एकादशीस तुळशी पूजन करण्याचे महत्त्वही त्यांनी सांगितले.

या सोहळ्याचे सूत्रसंचलन मेघा बिहाणी आणि वैष्णवी लढ्ढा यांनी केले. राधाकृष्ण परिवाराच्या कार्याची माहिती अमोल सोनी यांनी दिली. फराळ महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.

शहरात प्रथमच आयोजित केलेल्या या सोहळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी राधाकृष्ण परिवाराने अथक परिश्रम घेतले. सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वी झाला. उत्तम नियोजन, पूजेची नेटकी मांडणी, कार्यकर्त्यांची प्रसन्नपणे चाललेली लगबग ही या सोहळ्याची वैशिष्ट्ये होती. भगवान श्रीकृष्णासह तुलसीमातेच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्यास माहेश्वरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.