गोव्यात सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणाचे राज्यभर लोण !
पणजी, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यात नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळल्याची दिवसागणिक नवनवीन प्रकरणे उघडकीस येऊ लागली आहेत. पूजा नाईक या महिलेला प्रारंभी अटक केल्यानंतर, दीपश्री सावंत, श्रद्धा प्रभुदेसाई यांचा सहभाग आढळून आला. ११ नोव्हेंबर या दिवशी ढवळी, फोंडा येथील एका विद्यालयातील शिक्षक योगेश शेणवी कुंकळ्येकर यांना सरकारी नोकरीसाठी सुमारे १ कोटी २० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याच्या प्रकरणी कह्यात घेतले आहे. नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळल्याच्या प्रकरणी फोंडा येथे आतापर्यंत एकूण ६ तक्रारी प्रविष्ट (दाखल) झाल्या आहेत. नोकरी विक्री प्रकरणांचे राज्यातील ६ तालुक्यांमध्ये लोण पसरले असून, लोकांची एकूण कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आगामी काळात आणखीन काही प्रकरणे उघडकीस येण्याचे संकेत आहेत.
नोकरी घोटाळाच्या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करा ! – महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांची मागणी
सरकारी खात्यांमध्ये नोकर्या मिळवण्यासाठी पैशांची देवाणघेवाण झाल्याच्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या आहेत. या प्रकरणी सर्वसामान्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे, तसेच सरकारी भरती प्रक्रियेतील पारदर्शकता टिकून राहावी, यासाठी नोकरी घोटाळा प्रकरणाचे सखोल अन्वेषण होणे आवश्यक आहे. अशा आरोपांमुळे सरकार आणि पक्ष यांची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता आहे आणि यामुळे यासंबंधी तातडीने योग्यती पावले उचलणे आवश्यक आहे, अशी मागणी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी १५ नोव्हेंबरला केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे.
नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळल्याच्या एका प्रकरणासंबंधी भाजपचे आमदार गणेश गावकर यांच्या आवाजातील एक कथित ध्वनिफित सामाजिक माध्यमात फिरत आहे. या ध्वनिफितीमध्ये ‘मोन्सेरात’ हे नाव आले आहे. या घटनेनंतर संतप्त होऊन मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी ही मागणी केली आहे. मंत्री मोन्सेरात पुढे म्हणाले, ‘‘मी सरकारमध्ये मंत्री आहे आणि आमदार गणेश गावकर यांच्या कथित ध्वनीफितीमध्ये माझ्या आडनावाचा उल्लेख झालेला आहे. असे असतांनाही भाजपचे स्थानिक नेते गप्प कसे बसले ? ध्वनीफितीमध्ये नोकरीच्या देवाणघेवाणासाठी ७ लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मी कुणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत. जर असे आढळून आले, तर मला मंत्रीमंडळातून काढून टाकावे.’’
नोकरीसाठी पैसे देणारा आणि घेणारा दोघांवरही कारवाई करावी !
मंत्री मोन्सेरात पुढे म्हणाले, ‘‘नोकरीसाठी पैसे घेणारा जसा गुन्हेगार आहे, तसाच देणाराही तितकाच गुन्हेगार ठरतो; कारण दोघांनीही भ्रष्टाचाराला खतपाणी घातलेले आहे. त्यामुळे दोघांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. सरकार नोकर्या विकत नाही; मात्र मधल्यामध्ये दलाल अशा भानगडी करतात. या सर्व प्रकरणांची स्वतंत्रपणे चौकशी होणे आवश्यक आहे.’’