भगवंताच्या प्रेमासाठी अपमानसुद्धा गिळावा !
एका तरुण जोडप्याने नुकताच अनुग्रह घेतला होता. ते दोघे गोंदवल्यास गेले. मुलगी तरुण आणि शिकलेली होती. स्वयंपाकघरात काही काम करावे; म्हणून ती तेथे गेली असता सोवळ्याओवळ्यावरून कुणीतरी तिचा कठोर शब्दांनी अपमान केला. तो तिच्या जिव्हारी लागला. मनाच्या अशा अवस्थेत येथे आपल्याला चैन पडणार नाही, तरी ‘आपण परत जाऊ’, असे ती यजमानास म्हणू लागली. नवर्याचे असे म्हणणे होते, ‘नामस्मरणाची अशी संधी वारंवार येत नसते; म्हणून झालेली गोष्ट तिने फारशी मनावर घेऊ नये.’ तरीसुद्धा तिने परत जाण्यासाठी हट्ट धरला; म्हणून नवरा-बायको श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना) भेटले. श्रीमहाराज एकदम आपणहूनच म्हणाले, ‘पूर्वी एकत्र कुटुंबपद्धत होती. नवी नवरी मुलगी सासरी आली, म्हणजे तिला सासू, सासरा, थोरले दीर, थोरल्या जावा, एक-दोन नणंदा असा परिवार असायचा. अशा कुटुंबात नव्या नवरीला तिचा काही अपराध नसतांना थोडे टोचून बोलण्याचाही प्रघात असायचा. अशा परिस्थितीत थोरली जाऊ त्या मुलीस काही शब्द टाकून बोलली. ते तिच्या मनास लागले आणि तिने सासर सोडून माहेरी जाण्याचे ठरवले. हे तिचे ठरवणे कितपत शहाणपणाचे होईल ?’ त्यावर ती मुलगी म्हणाली, ‘यजमानांचे प्रेम संपादन करण्यासाठी असले बोलणे निमूटपणे ऐकून घेणेच उचित आहे.’ त्यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘हे जसे खरे तसेच आपल्याला भगवंताचे प्रेम जोडायचे असेल, तर आणि त्यासाठीच आपण येथे आलो आहोत, तर झालेली गोष्ट मनावर न घेणे, हेच उचित आहे.’ श्रीमहाराजांच्या बोलण्याने त्या मुलीचे पूर्ण समाधान झाले आणि परत जाण्याचा बेत तिने रहित केला.
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)