साधना करून व्यक्तीने उच्च आध्यात्मिक पातळी गाठल्यास तिचे नाव, आडनाव, वेशभूषा अशा तिच्या कोणत्याही गोष्टीचा तिच्या स्वतःवर परिणाम होत नसणे
प्रश्न : व्यक्तीला असलेल्या तिच्या विचित्र आडनावाचा व्यक्तीवर काही विपरीत परिणाम होतो का ? होत असल्यास त्यावर उपाययोजना काय ? ती आडनावे पालटावी का ?
उत्तर : ‘व्यक्तीचे नाव आणि आडनाव सात्त्विक असेल, तर व्यक्तीवर सकारात्मक परिणाम होतो. याउलट व्यक्तीचे नाव आणि आडनाव असात्त्विक किंवा विचित्र असेल, तर व्यक्तीवर नकारात्मक परिणाम होतो. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार व्यक्तीच्या नावातील किंवा आडनावातील शक्तीचा व्यक्तीवर परिणाम होतो. व्यक्तीच्या नावाचा व्यक्तीवर ७० टक्के परिणाम होतो आणि तिच्या आडनावाचा केवळ ३० टक्केच परिणाम होतो. त्यामुळे व्यक्तीच्या आडनावापेक्षा तिचे नाव सात्त्विक असणे अधिक महत्त्वाचे आहे.
एखाद्याचे आडनाव असात्त्विक, विचित्र किंवा एखाद्या प्राण्याचे असेल, तर ते पालटणे, हा एक स्थुलातील पर्याय आहे; पण ही प्रक्रिया किचकट आहे. सर्व सोपस्कार करून आपण आपले आडनाव पालटले, तर तो पालट आपल्याला आपली सर्व कागदपत्रे आणि ओळखपत्रे यांमध्ये करावा लागतो. यासाठीही पुष्कळ वेळ द्यावा लागतो. त्यापेक्षा व्यक्तीच्या आडनावाचा व्यक्तीवर परिणाम होऊ नये, यासाठी सूक्ष्मातील पर्याय निवडणे आवश्यक आहे. हा सूक्ष्मातील पर्याय म्हणजे त्या व्यक्तीने साधना करणे !
साधना करू लागल्यास प्रथम मनोलय होतो. या मनोलयाच्या वेळी व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ७० टक्के होऊन तिला ‘संतपद’ प्राप्त होते. त्या वेळी तिच्या आडनावाचा तिच्यावरील प्रभाव अल्प होऊन तो २० टक्के उरतो. (आधी तो ३० टक्के असतो.) आणखी पुढे साधना केल्यावर व्यक्तीचा बुद्धीलय होतो. बुद्धीलयाच्या वेळी व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ८० टक्के होऊन तिला ‘सद्गुरुपद’ प्राप्त होते. त्या वेळी तिच्या आडनावाचा तिच्यावरील प्रभाव आणखी अल्प होऊन तो १० टक्केच उरतो.
व्यक्तीवर होणारा आडनावाचा परिणाम हा पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांच्या स्तरावरील आहे. जर एखादी व्यक्ती साधना करून पंचतत्त्वांच्याही पुढच्या स्तरावर, म्हणजे निर्गुण स्तरावर गेल्यास तिच्यावर आडनावाचा परिणाम होणार नाही. व्यक्तीने निर्गुण स्तरावर जाणे, म्हणजे साधना करून ९० टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे आणि ‘परात्पर गुरु’पद प्राप्त करणे. या स्तरावर ती त्रिगुणातीत होते, म्हणजे निर्विचार स्थितीला जाते.
याचा अर्थ असा की, साधना करून व्यक्तीने उच्च आध्यात्मिक पातळी गाठल्यास तिचे नाव, आडनाव, वेशभूषा अशा तिच्या कोणत्याही गोष्टीचा तिच्या स्वतःवर पुष्कळ अल्प परिणाम होतो, किंबहुना तो होतही नाही.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती !
अर्थहीन आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी नसलेल्या आडनावांविषयीची माहिती कळवा !
‘व्यक्तींच्या आडनावांमागे काहीतरी इतिहास किंवा पार्श्वभूमी असते, उदा. मराठी भाषेतील कुलकर्णी, पाटील, देशमुख, देशपांडे, ही आडनावे त्यांच्या पदांवरून पडली आहेत; तसेच सुतार, कोळी, माळी ही आडनावे त्या व्यक्तींच्या व्यवसायांवरून पडली आहेत आणि त्यांचा काहीतरी अर्थ आहे; पण काही आडनावांचा काही अर्थही नाही आणि त्यांमागे कोणताही इतिहास किंवा पार्श्वभूमी नाही. विविध भाषांतील अशा आडनावांची उदाहरणे पुढे दिली आहेत.
अशा प्रकारच्या आडनावांचा अभ्यास चालू आहे. ज्यांना याविषयी काही माहिती असेल, त्यांनी ती sankalak.goa@gmail.com या ई-मेल पत्त्यावर कळवावी.’
– ग्रंथ विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.५.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |