Bangladesh International Court Of Justice : सध्याच्या परिस्थितीवर न्याय मिळावा, या आशेने आम्ही खटला प्रविष्ट केला !

बांगलादेशातील हिंसाचाराच्या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला प्रविष्ट करणारे अन्वरझ्झमन चौधरी यांचे विधान

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात ऑगस्टमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पलायन करावे लागले. या हिंसाचारात त्यांच्या अवामी लीग पक्षाच्या कार्यकर्त्यांवर, तसेच हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेली आहे. ही याचिका प्रविष्ट करणारे अवामी लीगचे ज्येष्ठ नेते आणि सिल्हेटचे माजी महापौर अन्वरझ्झमन चौधरी यांनी म्हटले आहे की, बांगलादेशातील ताज्या परिस्थितीवर न्यायाच्या आशेने आम्ही हा खटला प्रविष्ट केला आहे.

अन्वरझ्झमन चौधरी

१. या याचिकेमध्ये ८०० पानांच्या कागदपत्रांचा समावेश आहे. यामध्ये या घटनांचा तपशीलवार अहवाल दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात सध्याच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार प्रा. महंमद युनूस, तसेच त्यांच्या मंत्रीमंडळातील ६१ सदस्य आणि विद्यार्थी नेते यांचीही नावे आहेत. अशा आणखी १५ सहस्र तक्रारी न्यायालयाकडे दाखल करण्याची सिद्धताही चालू आहे.

हिंदूंवर आक्रमण

२. अन्वरझ्झमन चौधरी म्हणाले की, मी स्वत: पीडित आहे, माझे घर जाळण्यात आले. मी निवडून आलेलो महापौर असूनही त्यांनी मला तेथून बलपूर्वक हटवले. माझ्यासह बांगलादेशाच्या सहस्रो नेत्यांवर त्यांनी आक्रमणे केली आहेत. या संपूर्ण प्रकरणात हिंदु आणि इतर अल्पसंख्यांक समुदाय, अवामी लीग आणि विरोधी पक्षांचे समर्थक अन् पोलीस यांविरुद्ध हिंसक कारवाया आणि हत्याकांड यांचा समावेश आहे. बांगलादेशात होणारा  हिंसाचार आणि मानवाधिकारांचे उल्लंघन अधोरेखित करणे, हा याचिका प्रविष्ट करण्याचा उद्देश आहे.

३. बांगलादेशातील हिंसाचाराने तेथील प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांना तडे गेले आहेत. यामुळेच अवामी लीगच्या महापौरांनी केलेल्या तक्रारीत अल्पसंख्यांकांसह राजकीय आणि पोलीस विभागातील लोकांचाही ‘पीडित’ म्हणून समावेश करण्यात आला असून बांगलादेशाचे सूत्र आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर उपस्थित केले आहे. तसेच तेथे होणार्‍या निवडणुकांच्या आधी महंमद युनूस यांच्या कट्टरतावादी सरकारला अडचणीत आणले आहे.