सावर्डे (जिल्हा रत्नागिरी) येथील सौ. वनिता शिवराम बांद्रे (वय ६४ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी
सावर्डे (तालुका चिपळूण) – येथील सौ. वनिता शिवराम बांद्रे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची घोषणा सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी केली. १४ नोव्हेंबर या दिवशी हा कार्यक्रम येथील श्री. शिवराम बांद्रे यांच्या निवासस्थानी पार पडला. सद्गुरु सत्यवान कदम यांनी श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सौ. वनिता बांद्रे यांचा सत्कार केला. या वेळी सनातनचे जिल्हासेवक श्री. महेंद्र चाळके आणि अन्य साधक उपस्थित होते.
या वेळी मनोगत व्यक्त करतांना श्री. शिवराम बांद्रे (सौ. वनिता बांद्रे यांचे पती) म्हणाले की, त्यांना कर्करोगाला सामोरे जाण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच बळ दिले. ‘कठीण प्रसंगांमध्ये साधना करा, देव तुमची प्रगती करेल’ या गुरुवचनावर श्रद्धा ठेवून त्यांनी प्रयत्न केल्यामुळे आज त्या जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्या. त्या रुग्णालयामध्ये असतांना तेथील डॉक्टरांनीही सांगितले, ‘‘तुम्ही एवढे आनंदी कसे दिसता ? तुमच्यावर गुरूंचीच कृपा आहे, त्यामुळे हा सर्व त्रास तुम्ही सहन करू शकता.’’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात राहून आनंदी रहाणार्या सौ. वनिता शिवराम बांद्रे !
‘एकदा सद्गुरु सत्यवान कदम आणि श्री. महेंद्र चाळके सावर्डे, रत्नागिरी येथील साधिका सौ. वनिता बांद्रे यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा कर्करोगामुळे रुग्णाईत स्थितीत असलेल्या बांद्रेकाकूंची सद्गुरु सत्यवानदादा आणि श्री. महेंद्र चाळके यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सद्गुरु सत्यवान कदम, कुडाळ सेवाकेंद्र, कुडाळ.
१ अ. सहनशील : ‘खरेतर सौ. बांद्रेकाकूंना चालतांना त्रास होतोे; पण त्यांच्या चालण्यातून ‘त्यांना त्रास होत आहे’, असे जाणवत नव्हते.
१ आ. प्रेमभाव : रुग्णाईत असूनही काकू इतरांना साहाय्य करण्याचा प्रयत्न करतात. साधकांना पाहून काकूंना पुष्कळ आनंद होतो. घरी कुणी आल्यावर त्यांना ‘चहा, सरबत किंवा काय खाऊ देऊ ?’, असे त्यांना वाटत असते.
१ इ. ‘आजारामुळे आता सेवा करता येत नाही’, याची काकूंना पुष्कळ खंत वाटते.
१ ई. दुर्धर रोगावर मात करण्यासाठी भावाच्या स्तरावर प्रयत्न करणे : कर्करोगासारखा दुर्धर रोग झाला असूनही काकू आनंदी आहेत. या रोगामुळे निराश न होता आजारावर मात करण्यासाठी त्या भावाच्या स्तरावर प्रयत्न करतात. त्यांच्या घरी गेल्यावर त्यांना पाहून मलाही आनंद झाला.
१ उ. संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्यावर अतूट श्रद्धा असणे : सनातनचे संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्यावर काकूंची अतूट श्रद्धा आहे. त्या मायेच्या संदर्भातील कुठलाही विषय न काढता केवळ साधनेविषयीच बोलत होत्या. ‘गुरुदेव योग्य ते करतील’, अशी त्यांची श्रद्धा आहे.’
२. श्री. महेंद्र चाळके, रत्नागिरी
२ अ. सहनशील आणि आनंदी : ‘सौ. बांद्रेकाकूंच्या कंबरेपासूनचा खालचा भाग वेदनादायी असून लुळा पडला आहे. अशा स्थितीतही त्या पुष्कळ आनंदी असतात. त्यांना भेटायला गेल्यावर ‘त्या आजारी आहेत’, असे मला वाटले नाही. त्यांच्याकडे पाहून मला शांत वाटत होते.
२ आ. काकूंच्या खोलीत चैतन्य जाणवत होते.
२ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
१. साधक भेटायला घरी आल्यावर ‘परम पूज्य गुरुदेवच भेटायला आले आहेत’, असा त्यांचा भाव असतो.
२. सद्गुरु सत्यवान कदम यांनी काकूंना नामजपादी उपाय करण्यास सांगितले आहेत. काकू सर्व नामजपादी उपाय अत्यंत भावपूर्ण रीतीने करतात. ‘परम पूज्य गुरुदेवांनीच हा नामजप सांगितला आहे’, असा त्यांचा भाव असतो.
३. काकू सदैव गुरुदेवांच्या अनुसंधानात असतात, उदा. प.पू. गुरुदेवांना हाक मारणे, त्यांचा नामजप मोठ्याने करणे.
४. बर्याचदा काकूंना ‘स्वप्नात प.पू. गुरुदेव आले आहेत’, असे दिसते. तेव्हा ‘गुरुदेव प्रत्यक्षच आले आहेत’, असे त्यांना जाणवते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक २३.१०.२०२४)
भाववृद्धीचे प्रयत्न करून गंभीर आजारपणाला सामोरे जाणार्या सौ. वनिता बांद्रे !
‘माझी पत्नी सौ. वनिता बांद्रे या मागील ६ ते ८ मासांपासून कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला सामोरी जात आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने आजारपणात नामजप, प्रार्थना, भाववृद्धीचे प्रयोग आदी करून त्या स्थिर रहाण्याचा प्रयत्न करत आहेत. या काळात लक्षात आलेली त्यांच्याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
१. सौ. वनिता बांद्रे यांनी आजारपणात केलेले भाववृद्धीचे प्रयत्न
१ अ. तपासणीसाठी जातांना : सौ. वनिता यांची रुग्णालयात एक तपासणी केली. ही तपासणी करतांना त्यांनी ‘माझे गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्या समवेतच आहेत’, असा भाव ठेवला होता.
१ आ. ‘सलाईन’ लावतांना : रुग्णालयात ‘सलाईन’ लावतांना पत्नीने ‘गुरुदेवांच्या चरणांचे तीर्थ माझ्या शरिरात जात आहे’, असा भाव ठेवला होता. ‘सलाईन’मधील औषधांचा रंग लाल असतांना त्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे आणि औषधांचा रंग पांढरा असतांना त्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे स्मरण करत.
१ इ. रुग्णालयात उपचार घेतांना : रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांच्याप्रती पत्नीच्या मनात पुष्कळ कृतज्ञताभाव असतो. ‘जणू देवताच स्वतःवर उपचार करत आहेत’, असा त्यांचा भाव असतो.
१ ई. साधक सौ. वनिता यांना भेटायला घरी आल्यावर ‘माझे गुरुदेव घरी आले आहेत’, असा त्यांचा भाव असतो.
२. साधिका घरी भेटायला आल्यावर पत्नीने ठेवलेला भाव आणि तिला आलेली अनुभूती
एकदा रामनाथी आश्रमातील साधिका सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) सौ. वनिता यांना भेटायला घरी आल्या होत्या. त्या वेळी सौ. वनिता यांनी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळच घरी आल्या आहेत’, असा भाव ठेवला. त्यामुळे त्यांना होणार्या वेदना एक घंटा पूर्णपणे थांबल्या.
३. सद्गुरु सत्यवान कदम घरी आल्यावर पत्नीला पुष्कळ आनंद होऊन त्यांना ‘स्वत: रुग्णाईत आहोत’, याचा विसर पडणे
सौ. वनिता रुग्णाईत असल्यामुळे सद्गुरु सत्यवानदादा ३ वेळा आमच्या घरी येऊन गेले. त्या वेळी सद्गुरु दादांनी त्यांना या आजारासाठी नामजप सांगितला. हा नामजप त्या नियमित २ घंटे करतात. सद्गुरु सत्यवानदादा घरी आल्यावर पत्नीला पुष्कळ आनंद होतो आणि ‘आपण रुग्णाईत आहोत’, हेच त्या विसरून जातात. त्या वेळी त्या पुष्कळ कृतज्ञताभावात असतात.
४. पत्नीमध्ये झालेले पालट
अ. गंभीर आजारामुळे पत्नीला एकटीने उठून बसता येत नाही, तरी त्या त्यांची कामे स्वतःच करण्याचा प्रयत्न करतात.
आ. माझ्याशी, तसेच नातेवाईक आणि शेजारी यांच्याशी त्या आता पूर्वीपेक्षा पुष्कळ प्रसन्नतेने बोलतात.
इ. आजारपणातही त्यांच्या चेहर्यावर पुष्कळ चैतन्य जाणवते. हे चैतन्य आधुनिक वैद्य, नातेवाईक, तसेच समाजातील लोक यांनाही जाणवते.’
– श्री. शिवराम बांद्रे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६९ वर्षे), सावर्डे, रत्नागिरी. (२५.९.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |