Hindu Makkal Katchi Leader Harassed : ‘हिंदु मक्कल कत्छी’चे युवा नेते ओंकार बालाजी यांना तमिळनाडू पोलिसांकडून अवैध अटक !

सद्गुरु जग्गी वासुदेव आणि त्यांच्या आश्रमावरील अन्याय्य कारवाईच्या विरोधात उठवला होता आवाज !

(हिंदु मक्कल कत्छी म्हणजे हिंदु जनता पक्ष)

‘हिंदु मक्कल कत्छी’चे युवा नेते ओंकार बालाजी

चेन्नई – ‘हिंदु मक्कल कत्छी’ या प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे युवा नेते ओंकार बालाजी यांना तमिळनाडू पोलिसांनी नुकतीच अवैध अटक केली. ‘हिंदु मक्कल कत्छी’च्या २७ ऑक्टोबरला कोईंबतूर येथे झालेल्या निषेध मोर्च्यात ओंकार बालाजी यांनी केलेल्या भाषणाचे कारण देत त्यांना अटक करण्यात आली. ओंकार यांनी त्यांच्या भाषणात ‘नक्कीरन’ या तमिळ नियतकालिकाचे संपादक गोपाळ यांनी सद्गुरु जग्गी वासुदेव आणि ‘ईशा योग केंद्र’ यांच्याविषयी केलेल्या नाहक आरोपांच्या विरोधात आवाज उठवला होता. यामुळे तमिळनाडू पोलीस आणि ‘नक्कीरन’ यांनी त्यांचा छळ चालू केला. ते सत्ताधारी द्रमुक पक्षाच्या सूचनेनुसार काम करत असल्याचा आरोप आहे. ‘हिंदु मक्कल कत्छी’चे संस्थापक अध्यक्ष अर्जुन संपत यांनी यासंदर्भात ‘सनातन प्रभात’ला माहिती दिली. ओंकार बालाजी यांचे हिंदु धर्माचे कार्य दडपण्याचे प्रयत्न चालवले जात आहेत, असा आरोपही संपत यांनी या वेळी केला.

१. ओंकार यांनी ‘ईशा फाऊंडेशन’च्या विरोधातील पोलीस कारवाईचा निषेध केल्याने द्रमुकचे नेते महंमद खलील याने त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.

२. त्यानंतर बालाजी यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, जो मद्रास उच्च न्यायालयाने संमत केला. पोलिसांनी कायदेशीर नियमावलीचे उल्लंघन करून बालाजी यांना अटक केली. पुढे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

३. ‘हिंदु मक्कल कत्छी’ने तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना ओंकार यांना न्याय्य वागणूक मिळावी, अशी विनंती केली आहे.

४. हिंदु समाज आणि हिंदु संस्था यांना अपकीर्त करण्याचा प्रयत्न यापुढेही हाणून पाडला जाईल, असा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

५. #JusticeForOmkar या हॅशटॅगने ओंकार बालाजी यांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन ‘सनातन प्रभात’ने त्याच्या एक्स खात्यावरून केले आहे.

तमिळनाडू पोलिसांचा हिंदुत्वनिष्ठ नेत्याला अपकीर्त करण्याचा घृणास्पद प्रकार !

तमिळनाडू पोलिसांनी ओंकार बालाजी यांना अवैध अटक करून रात्रभर पोलीस ठाण्यात डांबून ठेवले, तसेच एका अट्टल गुन्हेगाराप्रमाणे त्यांच्या गळ्यात गुन्हेगाराची पाटी घालून त्यांचे छायाचित्र काढले आणि सामाजिक माध्यमांतून ते प्रसारित केले.

संपादकीय भूमिका

  • तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक आणि त्यांच्याच ताटाखालचे मांजर असलेले तमिळनाडू पोलीस हे प्रखर ‘सनातन’द्वेष्टे असल्याने हिंदु संत अन् हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर अन्याय होतो, यात काय आश्‍चर्य ?
  • तमिळनाडूत सातत्याने हिंदु आणि राष्ट्र विरोधी घटना घडत असल्याने राष्ट्रप्रेमींकडून आता तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी झाली पाहिजे.