विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी जनता महायुतीला निवडून देणार ! – प्रभाकर सावंत, जिल्हाध्यक्ष, भाजप
वेंगुर्ला – विकसित भारतासाठी महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे विकसित राज्य बनवण्याचा भाजपचा संकल्प आहे. महाराष्ट्राची सुजाण जनताही या संकल्पांच्या पूर्ततेसाठी महायुतीसमवेत राहील. राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोचवण्यासाठी गतीमान विकास हे भाजपचे ध्येय आहे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी येथे स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजपच्या संकल्प पत्राचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते १० नोव्हेंबरला मुंबईत झाले. पक्षाच्या संकल्प पत्राची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते.
प्रभाकर सावंत म्हणाले,
१. या संकल्प पत्रासाठी सामान्य नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. ८७७ गावांतून ईमेल आणि पत्रे आली. ८ सहस्र ९३५ सूचना आल्या. संकल्प पत्रातील एकेक सूत्राच्या आधारे त्यांची कार्यवाही करण्यासाठी समिती नेमली जाईल.
२. भाजपने अनेक आश्वासने पूर्ण केली असल्याने देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्तेचा कौल दिला आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या संकल्पपूर्तीसाठी महायुतीने महाराष्ट्रातही ठोस विश्वासाने वाटचाल चालू केली असून महाराष्ट्र सशक्त, समृद्ध आणि सुरक्षित राज्य बनवू.
३. कलम ३७० रहित करून भाजपने जम्मू-काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणले; मात्र काँग्रेस आघाडीतील पक्षांनी ते पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. तीन तलाक पद्धत रहित करून मुसलमान समाजातील पीडित महिलांना दिलासा दिला आहे. याखेरीज नागरिकत्व कायद्यात सुधारणा, राममंदिराची उभारणी, अशी अनेक आश्वासने भाजप सरकारने पूर्ण केली आहेत.
४. महाविकास आघाडीने सत्तेसाठी लांगूलचालनाची विचारधारा स्वीकारली आहे, असा आरोप करून सावंत म्हणाले की, तेलंगाणा, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत निवडणूक काळात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात काँग्रेसला अपयश आले आहे.
कर्नाटकमध्ये अनेक गावे ‘वक्फ बोर्ड’ची संपत्ती म्हणून घोषित झाली आहेत. सामान्य माणसाची संपत्ती वक्फ बोर्डच्या कह्यात जाऊ नये, यासाठी पंतप्रधान मोदी सरकारने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणले आहे, असे सावंत यांनी या वेळी सांगितले.