फर्मागुढी (गोवा) येथील आयआयटी संकुलात बाँब ठेवल्याचा खोटा संदेश
शेकडो विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हालवले : यंत्रणा वेठीस
फोंडा, १४ नोव्हेंबर – फर्मागुढी, फोंडा येथील आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था) परिसरात बाँब असल्याची धमकी मिळाल्यानंतर संकुलातील ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना तेथून बाहेर काढण्यात आले. गोवा, भुवनेश्वर आणि देहली येथील आयआयटी परिसरात बाँब ठेवण्यात आल्याचा संदेश पहाटे ४ वाजून १४ मिनिटांनी आला होता. याविषयी पोलिसांना कळवल्यावर पोलिसांसह बाँब निकामी करणारे पथक, अग्नीशमन आणि आपत्कालीन यंत्रणा यांनी परिसरात शोध घेतला. अंदाजे ३ घंटे हा शोध चालू होता. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आज १४ नोव्हेंबरपासून चालू होणार होत्या. याच दिवशी हा खोटा संदेश आल्याने यामागील देशविरोधी शक्तींचे षड्यंत्र दिसून येते. यापूर्वी देशभरातील विमानतळांवर किंवा विमानात बाँब ठेवल्याचे खोटे संदेश येऊन प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरण्यात आले होते.
हा संदेश उमपथी पद्मनाभन या व्यक्तीने पाठवला असल्याची माहिती आयआयटीच्या कुलसचिवांनी दिली आहे.