योग्य पद्धतीने चालण्याने चांगले स्वास्थ्य लाभणे !
निरोगी जीवनासाठी व्यायाम – भाग २७
आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गोनॉमिक्स’ (ergonomics)चे तत्त्व आणि आजारानुसार योग्य व्यायाम यांची माहिती सादर करणार आहोत.
मागील लेखांकात आपण प्रतिदिन चालण्याने होणारे लाभ आणि चालण्याची आवश्यकता यांविषयी माहिती वाचली. आज आपण चालण्याच्या योग्य आणि अयोग्य पद्धती अन् त्यांमुळे होणारे लाभ, तसेच हानी समजून घेऊया.
या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/854039.html
१. चालतांना शरिराची ठेवण कशी असावी ?
‘गतीने चालण्याचा लाभ तर होतोच; पण त्या वेळी ‘शरिराची ठेवण कशी असते ?’, यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. आपल्या सांध्यांवर कोणत्या प्रकारे जोर किंवा ताण पडतो, यावर त्यांचे आयुष्य अवलंबून असते. त्यामुळे चालतांना शरिराची स्थिती योग्य ठेवणे आणि चालण्याची पद्धतही योग्य असणे अत्यावश्यक आहे.
२. अयोग्य पद्धतीने चालण्याने होणारी हानी
सध्या संगणकीय कामांमुळे अनेकांना नकळत कुबड काढून बसण्याची, तसेच काहींना थोडे झुकून चालण्याची सवय लागलेली आहे. त्यामुळे श्वसनक्रिया, पचनक्रिया इत्यादींवर दुष्परिणाम तर होतोच आणि त्याच समवेत अनेक प्रकारची दुखणीही उद्भवत असतात.
३. योग्य पद्धतीने चालण्याने होणारे लाभ
अ. पचनशक्ती सुधारते, तसेच यकृत आणि आंतडी यांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, डोकेदुखी, सर्दी, पडसे, दमा यांसारखे अनेक रोग बरे व्हायला साहाय्य होते.
आ. सकाळी किंवा सायंकाळी मोकळ्या हवेत चालण्याने नवे चैतन्य, स्फूर्ती, उत्साह आणि आरोग्य प्राप्त होते.
४. चालण्याची योग्य पद्धत
अ. चालतांना पाठ ताठ आणि खांदे मागे असावेत. (‘डोक्यावर एक दोरी बांधून आपल्याला वर ओढत आहे’, अशी कल्पना केल्यावर ताठ होणे सोपे जाते.)
आ. चालतांना हातांची हालचाल नैसर्गिक असणे आवश्यक असते. त्यामुळे चालायला गती तर मिळतेच, तसेच संपूर्ण शरिराचा व्यायामही होतो, अन्यथा केवळ पायांची कसरत होत असते.
इ. पाय पुढे टाकतांना पायाची टाच भूमीवर प्रथम टेकेल आणि नंतर त्या पायाचा पंजा भूमीवर टेकेल, अशा रितीने पाय टाकावेत. सहज टाकता येतील, अशा पद्धतीने (बेताने) पाय लांब टाकावेत.
ई. पोटाचे स्नायू आणि अवयव यांसाठी मांडी वर उचलून पाय पुढे टाकणे अत्यंत महत्त्वाचे आहे, तसेच शरिरावर योग्य जोर पडण्यासाठीही आवश्यक आहे.
उ. शक्य असल्यास उघड्या पायाने चालावे आणि कपडे सैलसर घालावेत.
५. चालण्याला खाणे-पिणे, ऋतू-काळ किंवा वेळ यांचे कसलेच बंधन नाही.’
(साभार : मासिक ‘व्यायाम’, शं. धों. विद्वांस, संपादक, १५.२.१९५७)
६. काही अयोग्य कृती
‘सध्या बरेच जण चालतांना पाय घासून किंवा केवळ गुडघे वाकवून चालतात. मांडी वर उचलून टाकण्याचा कंटाळा असतो किंवा त्याची जाणीवच नसल्याने त्यांच्या लक्षात येत नाही.
७. उपाययोजना
प्रतिदिन पुरेसा वेळ मिळत असल्यास, शक्य तिथे वाहनाचा वापर टाळावा, उदा. जवळच्या दुकानात दुचाकीऐवजी चालत जाणे आणि सुटीच्या दिवशी अधिक चालले (उदा. प्रतिदिन ३-४ कि.मी. ऐवजी सुटीला १०-१२ कि.मी. चालणे), तर आठवडाभर त्याचा लाभ होतो.
८. महत्त्वाची सूचना
एखाद्या व्यक्तीला श्वसन, हृदयाशी संबंधित किंवा अन्य कोणताही मोठा आजार असल्यास त्याने वैद्यकीय समुपदेशानुसारच चालणे चालू करावे.’
– सौ. अक्षता रेडकर, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (४.११.२०२४)
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise