कापूस पिकाची ‘व्यथा’ !
उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस या पिकाला अतीवृष्टी, परतीचा पाऊस अन् अवेळी पडणार्या पावसाचा फटका बसला आहे. दक्षिणेत ईशान्य मोसमी वार्याचा जोर वाढल्यामुळे दक्षिण कर्नाटकातील कापूस पीक धोक्यात आले आहे. वेचणीला आलेल्या कापसात ओलावा अधिक राहिल्यामुळे तो कुजत आहे, तसेच बुरशी लागून काळा पडत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. प्रतिवर्षी राज्यात ‘विजयादशमी’ हा दिवस कापसाचा शुभमुहूर्त म्हणून गणला जातो.
सध्या राज्यातील कापूस मोठ्या प्रमाणात बाजारात येऊ लागला आहे. केंद्रशासनाने मध्यम धाग्याच्या कापसाला ७ सहस्र १२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला ७ सहस्र ५२१ रुपये हमीभाव घोषित केला आहे; पण या हमीभावाने कुठेच कापसाची खरेदी होतांना दिसत नाही. राज्यभरात केवळ ६ सहस्र ते ६ सहस्र ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. कापसात आर्द्रता अधिक असल्याचे कारण सांगत व्यापार्यांकडून कापसाला अल्प दर दिला जात आहे. दुसरीकडे कापूस वेचणीचे १० ते १२ रुपये प्रति किलो (१ सहस्र ते १ सहस्र २०० रुपये प्रति क्विंटल) वाढते दर यांमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. हे म्हणजे ‘माय (आई) भाकर देईना आणि बाप (वडील) भीक मागू देईना’, अशी शेतकर्यांची अवस्था झाली आहे. परतीच्या पावसाने शेतकर्याची खरीप हंगामातील पिकांची कापणी, काढणी विलंबाने झाल्याने शेतीची सर्व कामे एकाच वेळी आली. त्यामुळे मजुरांची न्यूनता भासू लागली. त्यातच शासनाच्या विविध योजनांच्या पूर्ततेसाठी अनेक पुरुष आणि महिला अडकल्या आहेत. काहींना ऐन दिवाळीत लाभ मिळाल्याने ते सुखावले आहेत. त्यामुळे शेतात कामाला मजूरच मिळेनासा झाला. याचा परिणाम कापूस शेतातच पडून आहे. एकीकडे मजुरांची टंचाई आणि दुसरीकडे सरकार कापूस आयात करत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. भारताने मागील हंगामात कापसाच्या १७ लाख ५० सहस्र गाठी आयात केल्या होत्या. यंदा भारत २५ लाख गाठी कापूस आयात करण्याची शक्यता आहे.
देशात सर्वाधिक कापूस महाराष्ट्रात पिकतो; पण सरकार ब्राझील आणि आफ्रिका येथून कापसाच्या गाठी आयात करते. त्यामुळे राज्यात कापसाला अल्प दर मिळतो. सरकारने तात्काळ हमीभाव केंद्र चालू करावे, अशी शेतकर्यांची अपेक्षा आहे. यावर पर्याय म्हणून शेतकर्याने कापसावर विसंबून न रहाता उत्पादन खर्च न्यून होईल, अशी मिश्र पीकपद्धत (सोयाबीन आणि तूर, कापूस अन् तूर), फळबाग लागवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांकडे वळण्याची आवश्यकता आहे. निसर्गदेवतेची कृपा होण्यासाठी नित्य साधना, शेतीमाऊलीविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी, तरच शेतकरी सुखी आणि समृद्ध होईल !
– श्री. नीलेश पाटील, जळगाव