‘मरणाचे स्मरण असावे’, ते कशासाठी ?

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

रेल्वेस्थानकावरील एक तिकीट मास्तर श्रीमहाराजांना भेटले. श्रीमहाराजांनी त्यांना विचारले, ‘उपनगरात जातांना लोकांनी परतीची तिकिटे घ्यावी, अशा पाट्या रेल्वेस्थानकावर लावलेल्या असतात ना ?’ तिकीट मास्तर म्हणाले, ‘होय आणि सुशिक्षित माणसे बहुधा परतीचीच तिकिटे काढतात.’ त्यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘प्रत्येक जिवाला ब्रह्मदेव पृथ्वीवर जन्मास घालतो. तेव्हा तो त्याच्या खिशात मरणरूपी परतीचे तिकीट घालूनच पाठवतो. एखादे वेळी एखाद्या प्रवाशाने तुम्हास जायचे तिकीट मागितले, तर ते देता येईल; पण ब्रह्मदेवास ते कदापि शक्य होणार नाही. तेव्हा प्रत्येक जीव जगात जन्मास येतो त्या वेळी मरणरूपी तिकीट त्याच्या खिशात घातले जाऊनच तो जन्मास येतो, हे ध्यानात ठेवावे. मरणाचे स्मरण राहिले, म्हणजे पापाचरण आपोआपच अल्प होईल. ते अल्प झाले की, सद्वासना येऊ लागतील आणि लक्ष थोडे परमार्थाकडे लागेल. ते लागले म्हणजे नाम घेण्याची बुद्धी होईल. नाम घेतले की, भगवंताचे प्रेम आपोआप होऊन अनुसंधान राहील आणि चित्तशुद्धी होईल. यातून एकाग्रता आली की, आपले काम होऊन जाईल.’

(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक – ल.ग. मराठे)