निवडणूक विशेष
२५० मतदारांची नावे अन्यत्रच्या मतदारसूचीत !
नवी मुंबई – ऐरोली विधानसभा मतदारसंघातील कोपरखैरणे सेक्टर – ८ येथील २५० मतदारांची नावे वगळण्यात आली असून त्यांचा अन्य ठिकाणच्या मतदारसूचीत समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.
२० नोव्हेंबरला सार्वजनिक सुटी !
मुंबई – मतदानासाठी २० नोव्हेंबर या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी घोषित करण्यात आली आहे. याविषयीचे परिपत्रक राज्यशासनाने काढले आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी इतर नावे येऊ शकतात ! – विनोद तावडे, भाजप
मुंबई – राज्यातील निवडणुकांनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व एकत्र बसून मुख्यमंत्री कोण असेल, हे ठरवतील. मुख्यमंत्रीपदासाठी अचानक इतरही काही नावे येऊ शकतात. राजस्थान आणि मध्य प्रदेश येथे जो प्रयोग करण्यात आला, तसा राज्यातही होऊ शकतो, अशी शक्यता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केली.
महायुती आणि मविआ यांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी
नाशिक – येथे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. मविआच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला, तर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण केल्याचा, तसेच वाहने फोडल्याचा आरोप मविआने केला आहे.
१ कोटी ३५ लाख रुपये जप्त !
नागपूर – पोलिसांनी सापळा रचून एका दुचाकीस्वाराच्या बॅगेतून १ कोटी ३५ लाख रुपये जप्त केले. प्रारंभी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; पण संशयापोटी पोलिसांनी रक्कम कह्यात घेतली.
मुंबईत मतदारांना सवलती !
मुंबई – मतदानासाठी मतदारांना प्रोत्साहन मिळवण्याच्या हेतूने विविध संघटना, संस्था आणि समूह विविध सवलती घोषित करत आहेत. ‘मतदान केल्यानंतर बोटावरील शाई दाखवा आणि २०, २१ आणि २२ नोव्हेंबर या दिवसांमध्ये १० ते १५ टक्के सवलत प्राप्त करा’, अशा आशयाच्या सवलती देण्यात येत आहेत. महाराष्ट्र रिटेलर्स असोसिएशन, उपाहारगृह व्यावसायिकांची संघटना असलेली ‘आहार’ संघटना, चित्रपटगृह व्यावसायिकांची संघटना यांच्यासह इतरही अनेक खासगी उद्योगसमूह, व्यावसायिक आस्थापने यांनीही ग्राहकांसाठी सवलती घोषित केल्या आहेत. छोटी दुकाने, आस्थापने, व्यावसायिक यांनीही अशा सवलती दिल्या आहेत.