रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘साधकत्व वृद्धी’ शिबिरात सहभागी झालेल्या धर्मप्रेमींना आलेल्या अनुभूती

एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘साधकत्व वृद्धी’ शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिरात सहभागी झालेल्या पुणे जिल्ह्यातील धर्मप्र्रेमींना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. अमोल भरत ठाकूर, पुणे

१ अ. श्री सिद्धिविनायक मंदिरातील शाळिग्रामवर असलेल्या सोनेरी वर्तुळात भारताचा नकाशा दिसणे : ‘रामनाथी आश्रम पहातांना मी आश्रम परिसरातील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेत होतो. तेव्हा मला मूर्तीसमोरील शाळिग्रामवर सोनेरी वर्तुळ दिसले. त्यामध्ये मला भारताचा नकाशा दिसला. तो पाहून ‘श्री गणरायाच्या कृपाशीर्वादाने आपला देश पुन्हा एकदा विश्वगुरु बनणार आहे आणि तो सोनियाचा दिवस पुन्हा पहायला मिळणार आहे’, असे मला जाणवले. या अनुभूतीसाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

२. कु. विवेक सुभाष शिरतोडे, भोर, जिल्हा पुणे.

२ अ. ‘सत्संग चालूच रहावा आणि तो संपूच नये’, असे वाटणे : ‘गुरुदेवांच्या कृपेने मी पुष्कळ लहान असल्यापासून सनातन संस्थेशी जोडलो गेलो. मी आईसमवेत सत्संगाला जात असे. तेव्हापासून माझी भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुमाऊली) यांच्याप्रती श्रद्धा वाढली. शिबिरात सत्संग चालू असतांना मला पुष्कळ प्रसन्न वाटायचे आणि ‘सत्संग चालू रहावा, तो संपूच नये’, असे मला वाटायचे.

२ आ. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून ‘श्रीकृष्ण प्रेमाने पहात आहे आणि वायुतत्त्वामुळे त्याचे केस हालत आहेत’, असे साधकाला जाणवणे : भगवंताच्या कृपेने मला रामनाथी आश्रमाच्या वैकुंठभूमीला भेट देण्याची संधी मिळाली. भगवान श्रीकृष्णावर माझी पुष्कळ श्रद्धा आहे. आश्रमातील स्वागतकक्षात असलेले श्रीकृष्णाचे चित्र अप्रतिम आहे. त्या चित्राकडे पाहून ‘श्रीकृष्ण माझ्याकडे पुष्कळ प्रेमाने पहात आहे आणि वायुतत्त्वामुळे त्याचे केस हालत आहेत’, असे मला जाणवले.

२ इ. ‘ब्रह्मोत्सवा’निमित्त मला माझ्या गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) साक्षात् श्रीकृष्णरूपात दर्शन झाले. ही मला आलेली मोठी अनुभूती होती.

२ ई. एका संतांचे दर्शन आणि त्यांचे चैतन्य यांमुळे पुष्कळ भावजागृती होणे : त्यानंतर मला एका संतांचे दर्शन झाले आणि माझ्या जन्माचे सार्थक झाले. ते समोर येताच माझ्या डोळ्यांतून अश्रू आले आणि त्यांचे दर्शन अन् चैतन्य यांमुळे माझी भावजागृतीही झाली. ही अनुभूती मी शब्दांत व्यक्तच करू शकत नाही. ‘त्यांना पहातच रहावे’, असे मला वाटत होते. त्यांच्या मुखावरील तेज आणि गुलाबी छटा वेगळीच होती. त्यांचे वर्णन करायला शब्द अपुरे पडत आहेत.

‘मला रामनाथी आश्रमातील या वैकुंठभूमीत आणि येथील साधकांच्या सहवासात ३ दिवस रहाण्याची संधी मिळाली’, हेच माझे पुष्कळ मोठे भाग्य आहे. यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि गुरुमाऊली यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

३. श्री. खंडू तुळशीराम डुंबरे, जुन्नर, पुणे.

३ अ. नामजप करत असतांना ‘दत्ताच्या रूपात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे दर्शन होणे : ‘मी घरी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत असतांना ‘मला दत्ताच्या रूपात गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) दर्शन झाले. मी त्यांना साष्टांग नमस्कार केला. तेव्हा ‘सर्व साधकांनीही त्यांना साष्टांग नमस्कार केला’, असे मला जाणवले.

३ आ. भावसत्संग ऐकून साधनेची आवड निर्माण होणे, नियमित नामजप करू लागल्यावर काही दिवसांनी समष्टी सेवेची संधी मिळणे : कोरोनाच्या काळापासून आम्ही दोघे पती-पत्नी भावसत्संग ऐकत होतो. सत्संग ऐकून आम्हाला साधनेची आवड निर्माण झाली आणि दोघेही नियमित नामजप करू लागलो. त्यानंतर काही दिवसांनी आम्हाला समष्टी साधना करण्याची संधी मिळाली. आम्ही सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे, साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांचे वितरण करणे, भावजागृतीविषयीच्या सत्संगांची लिंक जिज्ञासूंना पाठवणे, तसेच त्यांचा आढावा घेणे इत्यादी सेवा करू लागलो.

३ इ. नातेवाइकांना नामजपाचे महत्त्व सांगणे : सत्संग ऐकून आमच्यात पुष्कळ पालट झाला. आम्ही आमच्या नातेवाइकांची सूची बनवून त्यांना सत्संगाला जोडू लागलो. घरी आलेल्या नातेवाइकांना साधना सांगू लागलो. त्यांना दत्तगुरूंचे लघुग्रंथ दिले. त्या सर्व नातेवाइकांनी नामजप चालू केला. जेव्हा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने नातेवाईक एकत्र यायचे, तेव्हा आम्ही तेथे सर्वांना कुलदेवी आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व सांगायचो.

३ ई. एका संतांचे  दर्शन झाल्यामुळे पुष्कळ भावजागृती होणे : मला रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहाण्याची आणि एका संतांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची तळमळ वाढली होती. त्यानंतर मला एका कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळाली. मी कार्यशाळेत आल्यावर मला त्या संतांचे दर्शनही झाले. माझ्या डोळ्यांतून अश्रू आले. त्यांचे दर्शन झाल्यामुळे माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘हे गुरुदेवा, ‘आमच्याकडून शेवटच्या श्वासापर्यंत व्यष्टी आणि समष्टी साधना करून घ्या’, अशी प्रार्थना करतो.’

४. सौ. विद्या राहुल शेटे, भोर, जिल्हा पुणे. 

४ अ. नामजपाला आरंभ केल्यावर त्रास न्यून होणे : ‘साधनेत येण्यापूर्वी मला पुष्कळ राग यायचा. पूर्वजांच्या त्रासामुळे घरात अडथळे आणि संकटे येण्याचे प्रमाण पुष्कळ होते. त्यामुळे सतत आजारपण आणि आर्थिक अडचणी येतच होत्या. आम्हा उभयतांमध्ये सतत भांडणे व्हायची. जेव्हा आम्ही नामजपाला आरंभ केला, तेव्हा खरेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची आमच्यावर कृपाच झाली. आम्हाला होणारे त्रास हळूहळू न्यून झाले. आता आम्ही हसतमुखाने आम्हाला होणार्‍या त्रासाला सामोरे जातो. आता मनात इतका आनंद असतो की, त्रास कधी आला आणि गेला, हेही कळत नाही. साधनेमुळे आपले प्रारब्ध न्यून होते किंवा त्याची तीव्रता न्यून होत असते. प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच माझी व्यष्टी आणि समष्टी साधना चालू आहे. त्यामुळे मला पुष्कळ आनंद मिळत आहे.

४ आ. चैतन्य आणि संतांचा सहवास यांमुळे ‘आपण स्वर्गातच आहोत’, अशी अनुभूती येणे : गुरुमाऊलींच्या कृपेने मला शिबिराला येण्याची संधी मिळाली. आश्रम म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच आहे. ‘आश्रमातील चैतन्य आणि संतांचा सहवास यांमुळे आपण स्वर्गातच आहोत’, अशी मला अनुभूती आली. त्यामुळे माझे मन आणि शरीर हलके झाले.

४ इ. संतांच्या दर्शनामुळे त्यांच्यामध्ये असणारा प्रीतीभाव अनुभवायला मिळणे : ‘एका संतांचे दर्शन होणार आहे’, हे कळताच ‘प्रत्यक्ष देवच भेटणार आहे’, असे वाटून आनंद होऊन भावावस्था वाढली. जसा तो क्षण जवळ येत होता, तसे आम्ही संत येण्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो. ते येताच त्यांची प्रभावळ पाहून आम्ही धन्य झालो. त्यांची ती गुलाबी प्रभावळ आणि त्यांच्यामध्ये असणारा प्रीतीभाव आम्हाला अनुभवायला मिळाला. ते सर्व साधकांची प्रेमाने विचारपूस करत होते. हे पाहून ‘केवळ भगवंतच असे करू शकतो’, असे मला वाटले.

‘प.पू. गुरुदेव, तुमची कृपा आमच्यावर शेवटच्या क्षणापर्यंत सदैव राहू दे’, अशी प्रार्थना आहे.’

(सर्व सूत्रांचा कालावधी मार्च २०२४ आहे.)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक