भारताला बळकटी देणारे आध्यात्मिक पर्यटन
‘पर्यटन’ ही संज्ञा आधुनिक आहे. पर्यटक आणि पर्यटन या संज्ञा परस्पर पूरक आहेत. पर्यटनामध्ये पर्यटक हा मूलभूत घटक असला, तरी पर्यटकांचे प्रवास करण्याचे हेतू मात्र विविधांगी असतात. अज्ञात प्रदेशाचा शोध घेणे, नवीन आणि चमत्कारिक स्थळांचा शोध घेणे, पर्यावरणातील नवीन पालट अनुभवणे, धार्मिकदृष्ट्या पवित्र स्थळांना भेटी देणे अन् शिक्षण आणि व्यापार इत्यादीचा अंतर्भाव यामध्ये होतो. प्रवासाची ही ध्येये मात्र नवीन नाहीत. सध्या ज्या व्यवसायाला ‘पर्यटन’ म्हणतात, त्याचे मूळ प्राचीन प्रवासात आढळते. मानवी संस्कृतीच्या विकासामुळे पर्यटनास एक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. पहिल्या महायुद्धानंतर पर्यटन हा एक सेवा उद्योग म्हणून समोर आला. पर्यटनामध्ये प्रामुख्याने भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक हे प्रमुख प्रकार असले, तरी सध्याच्या काळात पर्यटनाचे स्वरूप पालटले असून निव्वळ मनोरंजन हा प्रमुख घटक झाला आहे. या अनुषंगाने प्रस्तुत अंकात सध्याच्या काळात पर्यटनाचा मूळ उद्देश लक्षात घेता, पर्यटन करतांना काय करावे ? काय टाळावे ? याचा उहापोह या विशेषांकात करण्यात आला आहे.
आतापर्यंत पर्यटनाच्या अनुषंगाने देश-विदेशांतील मौजमजेच्या किंवा मनोरंजन, करमणूक करणार्या ठिकाणी फिरायला जाण्याची पर्यटकांची मानसिकता होती. त्यामुळे अशा ठिकाणांमधूनच भारतालाही उत्पन्न प्राप्त होत असे. आता हा ‘ट्रेंड’ पालटत आहे. कोरोना महामारीच्या काळापासून लोकांच्या मानसिकतेत परिवर्तन झाले आहे. केवळ सुख-पैसा यांच्या मागे धावणारे लोक आदर्श जीवनशैली स्वीकारणे, शांतीचे अनुसरण करणे, तसेच अध्यात्माकडे वळणे अशा विषयांकडे आकृष्ट झाले. आध्यात्मिक ठिकाणी, धार्मिक क्षेत्री किंवा तीर्थस्थळांना भेटी देण्याचे पर्यटकांचे प्रमाण वाढले.
२२ जानेवारी २०२४ हा दिवस भारतासह जगभरातील लोकांच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय ठरला. या दिवशी श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे सर्वत्र अध्यात्म, तसेच भक्तीभाव यांचे पुन्हा एकदा बीज रोवले गेले. लोकांमध्ये धर्म, संस्कृती, हिंदुत्व, अध्यात्म, तसेच भक्ती या विषयांची गोडी निर्माण होणे, हे भारतासाठी गौरवास्पद आहे. ‘अध्यात्म’ आणि ‘धर्म’ हा सध्या लोकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग झाला आहे.
भारतभूमी ही पूर्वापार काळापासून ‘आध्यात्मिक’ म्हणूनच ओळखली जाते. भारताला लाभलेली समृद्ध संस्कृती, परंपरा यांचा अभ्यास करण्यासाठी, तसेच ती जाणून घेण्यासाठी जगभरातील लोक भारताला भेट देतात. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असणार्या भारतात उपलब्ध असलेल्या आध्यात्मिक पर्यटनाच्या दालनाकडे पर्यटकांनी आकृष्ट होणे, त्या विषयांमध्ये त्यांनी स्वारस्य दाखवणे हे स्तुत्य आहे. आध्यात्मिक पर्यटनाच्या कक्षा रुंदावत आहेत. हे पर्यटन सर्वांसाठी आनंददायी आणि ज्ञानवर्धक ठरत आहे. या माध्यमातून प्रत्येकाच्याच कल्याणाचा मार्ग साधला जाऊ शकतो. थोडक्यात आध्यात्मिक पर्यटन भारताला बळकटी देत आहे. जगातील लक्षणीय लोकसंख्या अध्यात्माचे केंद्र, मोक्ष प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम स्थान आणि योग अन् आयुर्वेद यांचे जन्मस्थान असलेल्या भारताकडे पहात आहेत.
आधुनिक भारत विकासाच्या पथावरून मार्गक्रमण करत आहे. जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होऊ पहात आहे. अशातच भारताने आता ‘आध्यात्मिक पर्यटन’ क्षेत्रातही पाया रोवण्यास प्रारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर अमृतसर, वाराणसी, सोमनाथ, शिर्डी, अयोध्या, पुरी, तिरुपती, मथुरा, द्वारका, बोधगया, गुरुवायूर आणि मदुराई अशा शहरांमध्ये मोठमोठ्या उत्पादक आस्थापनांचा (ब्रँड) विस्तार होत आहे. या पर्यटनाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम होत आहे.
आध्यात्मिक पर्यटनातून अंतर्परिवर्तन !
भारत ‘विश्वगुरु’ असल्याने आध्यात्मिकतेची आधारशिला भारताला लाभलेली आहे. ती अधिक बळकट करणे आणि वृद्धींगत करणे अपेक्षित आहे. पर्यटन आस्थापनांनी आध्यात्मिक पर्यटनाकडे केवळ आर्थिकवृद्धीच्या एकांगी दृष्टीने न पहाता त्यातून राष्ट्रोत्कर्ष कसा साधला जाईल, हे पहायला हवे. ‘विकास’ आणि ‘अध्यात्म’ दोन्ही हातात हात घालून चालल्यासच देशाची उन्नती होते. त्यामुळे केवळ ‘पैसा’ हे लक्ष्य न ठेवता पर्यटकांमध्ये खर्या अर्थाने अंतर्परिवर्तन साधले जावे, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. भक्तीभाव वृद्धींगत होणे, आचारधर्म, तसेच अध्यात्म यांचा पाया टिकवणे, आध्यात्मिकतेच्या दृष्टीने पर्यटकांची मानसिकता निर्माण करणे, धर्म-संस्कृती अबाधित ठेवणे, आध्यात्मिक पर्यटनाचा सर्वत्र प्रचार करणे, तसेच आध्यात्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रे अशा ठिकाणी असलेले धार्मिकतेचे बीज मनामनांत रुजवणे, असे सर्व हेतू आध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून साध्य व्हायला हवेत. आध्यात्मिक पर्यटनाचा विषय शिक्षणक्षेत्रातही अंतर्भूत केला, तर विद्यार्थीदशेपासूनच मुलांमध्ये त्याची गोडी निर्माण होईल. तरच केवळ पैसा उडवण्याच्या मागे लागलेली पिढी निर्माण न होता ती आत्मशुद्धी होण्यासाठी प्रयत्न करील. अशा प्रकारे अध्यात्माची पार्श्वभूमी लाभलेली पिढी देशाचे भवितव्य उज्ज्वल करू शकते !
प्राचीन, तसेच जागृत मंदिरांना भेटी देण्यातून प्रार्थना करणे, देवतेचा कृपाशीर्वाद संपादन करणे, हे संस्कार जीवनोद्धार घडवून आणतात. पावन ठिकाणच्या विविध नद्यांमध्ये केले जाणारे पवित्र स्नान आध्यात्मिक शुद्धीकरण घडवून आणते. ध्यानधारणेसाठी उपयुक्त आध्यात्मिक स्थळे आत्मिक आनंद अन् शांती यांची प्राप्ती करून देतात. या सर्वांतून आध्यात्मिकतेला प्रोत्साहन मिळते. भारताला लाभलेल्या या आध्यात्मिकतेच्या समृद्ध वारशाचे भविष्यातील पिढ्यांसाठी जतन करणे, हे प्रत्येकाचे धर्मकर्तव्य आहे. सरकारनेही धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटनाला सर्वप्रकारे चालना द्यायला हवी. आध्यात्मिकतेची अंतर्दृष्टी स्वतःत निर्माण करणे, स्वतः प्रेरित होऊन इतरांना प्रेरित करणे, हेच आध्यात्मिक पर्यटनाचे खरे गमक आहे.
आध्यात्मिक पर्यटनाच्या विचारधारेला योग्य दिशा आवश्यक !
पर्यटकांच्या आध्यात्मिक पर्यटनाच्या विचारधारेला योग्य दिशा देणेही तितकेच आवश्यक आहे. पर्यटकांची आवड पहाता आता पर्यटन आस्थापनेही (ट्रॅव्हल एजन्सीज) आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीने प्रयत्नरत आहेत. आध्यात्मिक पर्यटनाला परमोच्च उंचीवर नेतांना कोणतेही गैरकृत्य होणार नाही, याचीही काळजी पर्यटकांनी घ्यायला हवी. भारतीय चालीरिती, परंपरा, संस्कृती यांचा अनादर होता कामा नये. धार्मिक स्थळांमधील पावित्र्य आणि चैतन्य टिकवून ठेवणे हे पर्यटकांचे नैतिक दायित्व आहे. पर्यटन आस्थापनांनीही आध्यात्मिक पर्यटनाच्या अंतर्गत संबंधित स्थळी कोणतेही अपप्रकार होत नाहीत ना, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.
भारतीय पर्यटनाचा इतिहास !
भारताच्या प्राचीन इतिहासाची पाने उलटून पाहिली, तर लक्षात येते की, पर्यटन, तीर्थाटन आणि देशाटन यांसाठी लोक प्रवास करत असत आणि त्याचा उपयोग कला-सौंदर्याचा विकास, ज्ञानार्जन अन् आध्यात्मिक उन्नती यांसाठी करण्यात येत असे, हे स्पष्ट कळून येते. इतिहासाचीही साक्ष आहे की, अरबस्तान आणि ग्रीस देशांत गणित, तत्त्वज्ञान अन् ज्योतिष इत्यादींचे अमूल्य ज्ञान तिथल्या पर्यटकांनीच इथून नेले होते. चीन देशाचे पर्यटक ह्येन सांग आणि फाहियान यांची कथा तर सर्वच जाणतात. त्यांनी भारतीय ज्ञान आणि संस्कृतीच्या अनेक मूल्यवान गोष्टी इथे ग्रहण केल्या अन् स्वत:च्या देशात जाऊन तेथील लोकांना त्यांनी ते ज्ञान दिले. अशाच प्रकारे भारताचे पर्यटक कुमारजीव, कौंडिण्य, बोधिधर्म यांनीही आपल्या आचरणाने, तपश्चर्येने आणि ज्ञानाने तेथील देशाच्या रहिवाशांना कृतार्थ केले. प्राचीन काळात हे जे घडले त्याचे पुनः मूल्यांकन करणे, त्यांचे नव्याने चलन चालू करणे, ही आजच्या काळाची सर्वांत मोठी आवश्यकता आहे.
(संदर्भ : मासिक ‘अखंड ज्योती’, सप्टेंबर २०१२)