‘वक्फ कायदा’ घटनाबाह्य असल्याने तो रहितच करणे आवश्यक ! – अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय
कोल्हापूर, १३ नोव्हेंबर (वार्ता.) – घटना जेव्हा लिहिली गेली, तेव्हा घटनेच्या कोणत्याच कलमामध्ये ‘वक्फ’च्या संदर्भात उल्लेख नाही. असे असतांना तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हा कायदा आणला. नंतर काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकाळात या कायद्यात अमर्याद अधिकार देण्यात आले. सध्या १० लाख एकरपेक्षा अधिक भूमी ‘वक्फ’कडे आहे. सध्याच्या कायद्यात ४४ सुधारणा सुचवल्या असून आम्ही आणखी २२ सुधारणा सुचवल्या आहेत. एकूणच ‘वक्फ’चा धोका ओळखून ‘वक्फ कायदा’ घटनाबाह्य असल्याने तो रहितच करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांनी केले. ते ‘भारतीय विचार मंच’च्या वतीने शाहू स्मारक येथे आयोजित ‘वक्फ’ कायद्याचे वास्तव’ या विषयावर बोलत होते. या प्रसंगी व्यासपिठावर श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे उपस्थित होते.
१. ‘वक्फ’ कायद्याच्या अंतर्गत कोणताही कागदोपत्री पुरावा नसतांना ‘वक्फ बोर्ड’ सांगतील ती भूमी, संपत्ती त्यांची आहे. देशातील अनेक राज्यांतील ‘डेमोग्राफी’ (लोकसंख्येचे प्रमाण) पालटत असून अनेक राज्यांतील अनेक जिल्ह्यांत हिंदू अल्पसंख्य होत आहेत. देशातील २०० जिल्ह्यांत हिंदू अल्पसंख्य आहेत, अशी स्थिती आहे. आपण जागृत झालो नाही, तर भविष्यात भयानक स्थिती उद्भवणार आहे.
२. जोपर्यंत हिंदू बहुसंख्य असलेला देश असतो, तोपर्यंत घटना अस्तित्वात आहे. अफगाणिस्तान आणि अन्य देशांमध्ये काय स्थिती आहे ते आपण पहातोच !
३. पंजाबमधील युवक आज अमली पदार्थांच्या व्यसनात पूर्णपणे अडकले असून आता त्यांचे लक्ष महाराष्ट्र आहे. विद्येचे माहेरघर समजल्या जाणार्या पुण्यात आज मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडत आहेत. महाविद्यालये, तरुण यांना अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढले जात आहे.
४. घुसखोरी, धर्मांतर आणि लोकसंख्येचा विस्फोट या हिंदूंसमोर असलेल्या प्रमुख समस्या असून त्यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी कठोर कायदे करणार का ? असे आपण त्यांना ठणकावून विचारले पाहिजे.
क्षणचित्रे
१. प्रारंभी ‘भारतमाता की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, या घोषणा देण्यात आल्या. अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांनी विविध उदाहरणे देतांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख आवर्जून केला.
२. व्याख्यानासाठी गर्दी झाल्याने सभागृह भरून गेले त्यामुळे अनेक युवक व्यासपिठावर येऊन बसले.
३. सांगलीत एका हिंदु कुटुंबातील मुलगी ‘लव्ह जिहाद’मध्ये फसली. अन्य युवतींच्या संदर्भात असे होऊ नये; म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे, असे अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांनी सांगितले.
४. मी सातत्याने जनजागृतीसाठी देशभर फिरत असून सोमवार ते शुक्रवार न्यायालय आणि उर्वरित दोन दिवस जागृतीसाठी कार्यक्रम, असे मी करत आहे. कोणत्याही सण-वारांसाठी मी घरी थांबत नाही, तर हिंदूंना जागृत करणे हेच सध्या माझ्यासमोरील प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे आजच्या व्याख्यानातून हिंदूंना जे जे समजेल ते त्यांनी सामाजिक माध्यमांद्वारे त्यांच्या मित्रांना पाठवावे आणि जागृती करावी, असे आवाहन अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांनी या प्रसंगी केले.
हिंदूंनी जाती-पातींचा विचार सोडून प्रथम भारतीय बनावे !
हिंदू नेहमीच जाती-जातींत विभागले गेल्याने पराभूत झाले. आजही आपण विविध जातींमध्ये विभागले गेलो आहोत. आज अनेक ठिकाणी हिंदूंच्या ज्या हत्या होत आहेत, त्या ती व्यक्ती ‘हिंदु धर्मीय’ आहे म्हणून होत आहे. उमेश कोल्हे यांची हत्यासुद्धा ते ‘हिंदु’ होते म्हणून झाली. त्यामुळे हिंदूंनी जाती-जातींत न विखुरता प्रथम भारतीय म्हणून एकत्र येणे आवश्यक आहे.