वेश्याव्यवसाय चालवणारी ७८ संकेतस्थळे गोवा पोलिसांकडून बंद
आंध्रप्रदेशातील सय्यद उस्मान आणि हरियाणातील महंमद मोहेबबुल्ला यांना अटक
पणजी, १३ नोव्हेंबर (वार्ता.) – गोवा ‘सायबर सेल’ पथकाने गोव्यात वेश्याव्यवसाय चालवणारी ७८ संकेतस्थळे (एस्कॉर्ट वेबसाइट्स) ओळखून ती बंद (ब्लॉक) केली आहेत. चित्तोड, आंध्रप्रदेश येथील ५४ वर्षीय सय्यद उस्मान आणि गुडगाव, हरियाणा येथील ३० वर्षीय महंमद मोहेबबुल्ला यांना एस्कॉर्ट संकेतस्थळ तयार केल्याबद्दल आणि वेश्याव्यवसाय जाळे चालवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
आंध्रप्रदेशातील मदनपल्ले येथून सय्यद उस्मान अशी २ संकेतस्थळ हाताळत होता आणि महंमद मोहेबबुल्ला हा वेश्याव्यवसायातील दलाल असून त्यांना अटक ही या अन्वेषणातील पहिली मोठी प्रगती आहे.‘एस्कॉर्ट सेवेद्वारे वेश्याव्यवसायाचे जाळे चालवणार्या इतरांना अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत. गुन्हे शाखा पोलीस ठाण्यांतर्गत पोलिसांनी कलम ६७, ६७ ए आयटी कायदा, महिला अशिष्ट प्रतिनिधित्व कायद्याचे कलम ६ आणि आयटीपी कायद्याची कलमे ४ आणि ५ या अंतर्गत गुन्हा नोंद केला असून अशी संकेतस्थळे कोण चालवत आहेत ?, याचा शोध घेण्यासाठी अन्वेषण चालू आहे.