धारगळ येथील स्थानिकांचा ‘सनबर्न’ला विरोध
म्हापसा, १३ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यातील अनेक ठिकाणी विरोधाला सामोरे गेल्यानंतर सनबर्नच्या आयोजकांनी त्यांचा ‘इलेक्ट्रॉनिक डान्स अँड म्युझिक (इडीएम्) महोत्सव’ धारगळ येथे हालवण्यात आल्याचे संकेतस्थळावर स्पष्टपणे सूचित केले आहे. संकेतस्थळावर धारगळ येथे महोत्सव होणार असल्याचे घोषित झाल्यावर पेडणेचे भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली येथील रहिवाशांनी धारगळ येथे ‘सनबर्न इडीएम्’ आयोजित करण्यास विरोध केला आहे. यासाठी रस्त्यावर उतरण्याची चेतावणी आर्लेकर यांनी दिली.
सनबर्नच्या संकेतस्थळावर म्हटले आहे की, सनबर्नचे ठिकाण आयुर्वेद रुग्णालय आणि मोपा लिंक उड्डाणपूल यांच्याजवळ आहे. २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. या कार्यक्रमाच्या तिकिटांचे मूल्य प्रतिदिन ३ सहस्र ५०० रुपये आहे. हा कार्यक्रम दुपारी २ वाजता चालू होईल आणि रात्री १० वाजता संपेल. पत्रकार परिषदेद्वारे किंवा कोणत्याही माध्यमांच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे या ठिकाणाची औपचारिक घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.