नोकरी घोटाळा प्रकरणी भाजपचे आमदार गणेश गावकर यांच्याविरुद्ध तक्रार
फोंडा – सावर्डेचे भाजपचे आमदार गणेश गावकर यांच्यावर सरकारी नोकरीचे आमीष दाखवून फसवल्याच्या प्रकरणी तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. या प्रकरणी गावकर यांच्यावर भ्रष्टाचार आणि गैरवर्तन, असे आरोप करण्यात आले असून अधिकृत चौकशी चालू झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सुदिप ताम्हणकर यांनी कुळे पोलीस ठाण्यात गावकर यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.
काँग्रेसच्या वतीने देहलीत पत्रकार परिषद
गोव्यातील नोकरी देण्याचे आमीष दाखवून लोकांना फसवण्याच्या प्रकरणांचे पडसाद १३ नोव्हेंबरला देहलीतही उमटले. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय सचिव आलोक शर्मा आणि गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी देहलीतील काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी काँग्रेसच्या नेत्यांनी काही प्रश्न उपस्थित केले.
‘आप’ची राज्यपालांच्या हस्तक्षेपाची मागणी
आम आदमी पक्षाने (‘आप’ने) गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांच्याकडे ‘त्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना त्वरित बोलावून घ्यावे’, अशी मागणी केली आहे. आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख अधिवक्ता अमित पालेकर, आमदार कॅप्टन व्हेंझी व्हिएगस, आमदार क्रूझ सिल्वा, तसेच नेते वाल्मीकि नाईक यांचा सहभाग असलेल्या शिष्टमंडळाने ही मागणी राज्यपालांकडे केली आहे.
‘पोलिसाची नोकरी देतो’, असे सांगून ६ लाख रुपयांची फसवणूक
पोलीस दलात शिपाई पदाच्या नोकरीचे आमीष दाखवून चिंचवड, चिंबल येथील रश्मी चोपडेकर यांच्या मुलाला ६ लाख रुपयांना फसवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी १३ नोव्हेंबरला झुवारी कॉम्प्लेक्स, बायणा, वास्को येथील उमा पाटील आणि तिचा मुलगा शिवम् पाटील यांना अटक केली आहे.
नोकरी घोटाळा सत्ताधारी भाजपसाठी मोठे आव्हान !
हा घोटाळा गोव्यातील सत्ताधारी भाजपसाठी मोठे आव्हान ठरत असून पक्षाचे शासन आणि उत्तरदायित्व यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विरोधकांनी या संधीचा लाभ घेत सरकारी नोकरभरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे.
पुढील काळात पोलीस तपासात काय निष्पन्न होते ? गावकर यांच्यावर कोणते आरोप ठेवले जातात ? आणि भाजप नेतृत्व या प्रकरणी कसा प्रतिसाद देते ? यावर लक्ष केंद्रित राहील.