परगावी जा; परंतु २० नोव्हेंबरला आपल्या गावी जाऊन मतदान करा ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

कोल्हापूर येथे मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांना मतदानाचे आवाहन करतांना जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर – प्रवासी मतदारांनो, तुम्ही आवश्यक कामासाठी परगावी जात आहात; पण २० नोव्हेंबरला आपले मतदान असलेल्या गावी पोचून मतदानाचा अधिकार बजावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक आणि शाहू मैदान येथील के.एम्.टी. स्थानकावर निवडणूक मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. एस्.टी.ने प्रवास करणार्‍या जिल्ह्यातील मतदारांना गुलाबपुष्प देऊन येत्या

२० नोव्हेंबर या दिवशी मतदान करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूरचे विभाग नियंत्रक शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांसह अन्य उपस्थित होते.

एस्.टी. महामंडळाचा मतदार जनजागृतीसाठी विशेष सहभाग ! 

एस्.टी. महामंडळाचा मतदार जनजागृतीसाठी विशेष सहभाग असून प्रत्येक एस्.टी.मध्ये बसस्थानकावरील कर्मचारी, चालक, तसेच वाहक यांपैकी ज्यांना जमेल, ते प्रवाशांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. जिल्ह्याची मतदान टक्केवारी या वेळी ८० टक्के पार करत एक नवा इतिहास रचूया, असेही ते सांगतांना दिसत आहेत.