निवडणूक विशेष
निवडणुकीसाठी ९ सहस्र बसगाड्या सज्ज
मुंबई – विधानसभा मतदानासाठी निवडणूक आयोगाने एस्.टी. प्राधिकरणाकडे ९ सहस्र २३२ बसगाड्यांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने एस्.टी.ने ती प्रक्रिया चालू केली आहे. यात पोलीस प्रशासनाकडून मागवलेल्या ४९० बसगाड्यांचाही समावेश आहे. निवडणूक आयोगाने बेस्टकडे ६०० बसगाड्यांची मागणी केली आहे; मात्र त्याविषयी अद्याप समजू शकलेले नाही. मुंबईतील १ सहस्र शाळेच्या बसगाड्यांचा वापर करण्यात येणार आहे.
डबेवाल्यांचा महायुतीला पाठिंबा !
मुंबई – डबेवाल्यांच्या अधिकृत संघटनेने भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांनाच पाठिंबा दिला आहे, असे ‘उत्तर मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट’चे अध्यक्ष उल्हास मुके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महायुती सरकारने डबेवाल्यांसाठी घरे देण्यासह जी कामे केली, ती पहाता हा पाठिंबा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
(म्हणे) ‘पंतप्रधान मशिदी उद्ध्वस्त करणारा कायदा आणतील !’
एम्.आय.एम्.चे नेते असदुद्दीन ओवैसी यांची गरळओक
भिवंडी – वक्फ विधेयक संमत झाल्यास भिवंडीतील मशिदी उद्ध्वस्त होतील. मदरसे बंद केले जातील. आपण यापूर्वीच एक मशीद गमावून बसलो आहोत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील इतर मशिदी उद्ध्वस्त करणारा कायदा आणू इच्छित आहेत, अशी गरळओक एम्.आय.एम्.चे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी केली. ‘मुसलमानांनी जागे व्हावे. ही लढाई आपल्याला लढायची आहे. जर या निवडणुकीत एम्.आय.एम्.ला मतदान झाले आणि आमचे उमेदवार निवडून आले, तर आम्ही वक्फची संपत्ती वाचवू शकतो’, असेही ते म्हणाले.
२८८ मतदारसंघात ४ सहस्र १३६ उमेदवार !
मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुका २८८ मतदारसंघांमध्ये एकूण ४ सहस्र १३६ उमेदवार आहेत. यामध्ये ३ सहस्र ७७१ पुरुष, ३६३ महिला आणि अन्य २ उमेदवार आहेत.
बनावट शासकीय तपासणी पथकाने २५ लाख रुपये लांबवले !
कोल्हापूर – येथे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शासकीय तपासणी पथक असल्याचे भासवून एका व्यावसायिकाची २५ लाख ५० सहस्र रुपयांची रक्कम लांबवली. ही घटना पुणे-बेंगळुरू महामार्गालगत तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ घडली. व्यावसायिक सुभाष हारणे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांची ५ पथके संशयितांचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे तावडे हॉटेल परिसरात शहराच्या प्रवेशद्वारावरच अधिकृत तपासणी पथक आहे. (गुन्हेगारांना पोलिसांचे भय नसणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)