मतदानासाठी सुटी, सवलत न दिल्यास कारवाई ! – डॉ. सुहास दिवसे, पुणे जिल्हाधिकारी
पुणे – मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या घंट्यांमध्ये सवलत देण्यात येते; मात्र काही आस्थापने, संस्था भरपगारी सुटी किंवा सवलत देत नसल्याचे आढळून आले आहे. सुटी किंवा सवलत न दिल्यामुळे मतदान करता येणे शक्य न झाल्याची तक्रार आल्यास त्या आस्थापनांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.
उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाच्या परिपत्रकानुसार मतदान क्षेत्रांत मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ते कामासाठी मतदारसंघाच्या बाहेर असतील, तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास २ ते ३ घंट्यांची सवलत देता येईल; मात्र त्यासंबंधीची पूर्व अनुमती घेणे बंधनकारक असेल, असेही जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले.