सेवेचा ध्यास असणारे आणि साधकांना साहाय्य करणारे वडोदरा (गुजरात) येथील साधक दांपत्य श्री. सुहास गरुड आणि सौ. सुजाता गरुड !
सौ. प्रीती पोद्दार, वडोदरा, गुजरात
१. आधार वाटणे
‘सौ. सुजाताताईंशी मनमोकळेपणाने सहज बोलता येते. कोणत्याही प्रकारची अडचण किंवा स्वतःची चूक त्यांना सांगतांना संकोच वाटत नाही. त्या प्रसंग समजून घेऊन योग्य दिशा देतात. त्यामुळे मला त्यांचा आधार वाटतो.
२. तीव्र त्रास असूनही अखंड सेवा करणे
सौ. सुजाताताई आणि श्री. सुहासदादा यांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. विविध सेवांच्या वेळी त्यांच्या त्रासाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते, तरीही ते अखंड सेवा करतात. ते दोघेही त्यांच्या त्रासाविषयी कधीच अनावश्यक चर्चा करत नाहीत.
३. गरुड दांपत्य अत्यंत मृदु आणि विनम्र आहे.
४. साधकांना साहाय्य करणे
ते दोघेही साधकांना शक्य तेवढे साहाय्य करतात. सौ. सुजाताताई सेवेच्या ठिकाणी येऊ शकत नसल्या, तरी त्या अन्य साधकांचे संपूर्ण नियोजन करतात. त्या भ्रमणभाषद्वारे संपर्क करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतात आणि साधकांना येणार्या अडचणी सोडवतात.
५. कर्तेपणा नसणे
ते दोघेही पुष्कळ सेवा करतात; परंतु त्यांना त्याचा गर्व वाटत नाही किंवा त्यांच्यात कर्तेपणाचे विचारही दिसून येत नाहीत. सुहासदादा अर्पण गोळा करणे आणि विज्ञापने मिळवणे या सेवा करतात. त्यांचा सुटीचा संपूर्ण दिवस ते या सेवांसाठी वापरतात. याविषयी त्यांचे कोणतेच गार्हाणे नसते.’ (४.८.२०२४)
सौ. सोनाली पोत्रेकर, फोंडा, गोवा
१. सेवेचा ध्यास
अ. ‘सौ. सुजाताताईंकडे अनेक सेवांचे दायित्व आहे. सर्व सेवा परिपूर्ण करण्याचा त्यांचा कटाक्ष असतो. त्यांनी पाट्याटाकूपणे सेवा केली, असे कधीच दिसले नाही.
आ. एकदा त्यांच्या सासूबाई त्यांच्या घरी आल्या होत्या. त्यांचा साधनेला विरोध आहे. तेव्हा घरातील सर्व कामे करून सगळेजण झोपल्यावर सुहासदादा आणि सुजाताताई मिळून ग्रंथ अहवालाची सेवा पूर्ण करत. ‘घरी अडचण आहे, तर या सेवेचे अन्य साधकांकडे नियोजन करू का ?’, असे त्यांना विचारले होते. त्या वेळी त्या म्हणाल्या,‘‘रात्री सगळे झोपल्यानंतर आम्ही सेवा करू. आता दुसरी काही सेवा करता येत नाही. त्यामुळे ही तरी करते.’’
२. भाव
सौ. सुजाताताईंमध्ये पुष्कळ भाव आहे. अनेक वेळा साधक ‘सेवा करतांना येणार्या अडचणींमुळे सेवा करणे जमणार नाही’, असा विचार करून हताश होतात; पण सुजाताताई ‘आलेल्या अडचणींवर कोणता उपाय काढू, ज्यामुळे मला सेवा करता येईल ?’, असे विचारून घेतात. त्याप्रमाणे सेवा करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात.
३. तळमळ
अ. सुहासदादांचे वैशिष्ट्य, म्हणजे ते पुष्कळ तळमळीने सर्व सेवा करतात. इतर कोणी सेवेचे दायित्व घेत नसेल किंवा साहाय्याला नसले, तरीही ते ‘मला शक्य होईल तेवढे करतो’, असे म्हणून सेवा करण्याचा प्रयत्न करतात.
आ. सुहासदादांनी सौ. सुजाताताईंना साधनेत आणले आणि आता ते दोघे दायित्व घेऊन सेवा करतात. त्यांच्या दोन मुली लहान आहेत. त्या दोघींवर साधनेचे संस्कार व्हावेत, यासाठी ते पुष्कळ तळमळीने प्रयत्न करतात.’ (८.९.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |