१५ नोव्हेंबर या दिवशी वाळकेश्वर (मुंबई) येथे बाणगंगेची भव्य महाआरती !
सहस्रावधी भाविकांची उपस्थिती अपेक्षित !
मुंबई – प्रभु श्रीरामांनी स्थापित श्री वाळकेश्वर महादेव शिवलिंगाच्या येथे प्रभु श्रीरामाने बाणाने निर्माण केलेल्या बाणगंगेची भव्य महाआरती १५ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. हा त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव वाराणसी येथील श्री काशी मठ संस्थानचे मठाधिपती प.पू. श्रीमद साम्यमिंद्रतीर्थ स्वामी यांच्या वंदनीय उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे. गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्ट आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिवर्षी मुंबईसह उपनगरांतील सहस्रावधी भाविक या सोहळ्याला उपस्थित रहातात. या वेळी प्रभु श्रीरामाने निर्माण केलेल्या बाणगंगेचे विधीवत् पूजन करून गंगेची महाआरती केली जाणार आहे. या वेळी गंगावंदन आणि गंगास्तुतीपर सांस्कृतिक कार्यक्रमही केले जाणार आहेत. गंगेचे प्रतीरूप असल्याच्या भावाने या दिवशी सहस्रावधी भाविक या सोहळ्याला उपस्थित रहातात. या तीर्थाचे माहात्म्य सर्वांपर्यंत पोचावे, यासाठी ‘गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्ट’कडून मागील काही वर्षांपासून बाणगंगेच्या भव्य महाआरतीचे आयोजन करत आहे.
यावर्षी मुंबई महानगरपालिकेच्या साहाय्याने हा सोहळा पार पडणार आहे. पोलीस, प्रशासन, महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग, बेस्ट विद्युत पुरवठा खाते आणि स्थानिक नागरिक यांच्या मोलाच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी ४० जलरक्षक, ८० च्या वर सुरक्षारक्षक आणि १०० अधिक स्वयंसेवक कार्यक्रमाच्या सुनियोजनासाठी उपस्थित असणार आहेत, अशी माहिती गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली. या कार्यक्रमाचा लाभ अधिकाधिक भाविकांनी घ्यावा, असे आवाहन गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रवीण कानविंदे यांनी केले आहे.