रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले (वय ७० वर्षे) यांच्यात साधिकेला जाणवलेले पालट !
१४.११.२०२४ (वैकुंठ चतुर्दशी) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. कस्तुरी भोसले यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त रामनाथी आश्रमातील सौ. संगीता चौधरी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यातील पालट येथे दिले आहेत.
आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसलेकाकू यांना ७० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून नमस्कार !
१. आंतरिक पालट होऊन भोसलेकाकू अधिक प्रमाणात आनंदी असल्याचे जाणवणे
‘काही दिवसांपासून आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसलेकाकूंमध्ये आध्यात्मिक पालट जाणवतात. त्यांना पाहिल्यावर आतून एक प्रकारचा आनंद जाणवतो आणि असे वाटते, ‘त्यांच्याकडे पहात रहावे.’ त्यांच्यात भोळाभाव असल्याचे जाणवते. त्यामुळे ‘त्या सतत आनंद अनुभव असतात’, असे मला जाणवते.
२. सकारात्मक वृत्तीत वृद्धी होणे
काकू प्रत्येक विषयासंदर्भात सकारात्मक असल्याचे जाणवते. ‘स्वतःची शस्त्रक्रिया, वेगवेगळे प्रसंग, त्यांना होणारा आध्यात्मिक त्रास किंवा सत्सेवा करणे अशा प्रत्येक विषयाकडे त्यांचा सकारात्मक दृष्टीने पहाण्याचा भाग पुष्कळ वाढल्यामुळे त्यांच्याकडून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात’, असे मला जाणवते.
३. खोलीतील देवघरातील देवतांची पूजा अत्यंत भावपूर्ण आणि श्रद्धेने करणे
काकू त्यांच्या खोलीतील देवघरातील देवतांची पूजा अत्यंत भावपूर्ण आणि श्रद्धेने करतात. त्यांच्यातील भाव आणि श्रद्धा यांमुळे मला असे वाटते, ‘त्यांची खोली म्हणजे प्रत्यक्ष देवाचा गाभारा आहे आणि मी त्यांच्या खोलीत जात नसून एखाद्या देवतेच्या मंदिरातच जात आहे.’
४. स्वीकारण्याची वृत्ती
त्या प्रत्येक प्रसंग मनापासून स्वीकारतात. त्यामुळे त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचे गार्हाणे नसते. त्या प्रत्येक प्रसंगाशी संबंधित कृती मनापासून करतात.
५. इतरांचे बोलणे पूर्णपणे ऐकून घेऊन त्यातून शिकण्यातील आनंद अनुभवणे
त्या सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. कुणीही साधक त्यांच्याशी बोलत असेल, तर त्या संबंधित साधकाचे संपूर्ण बोलणे पूर्णपणे ऐकतात आणि त्यातून शिकतात अन् त्यातील आनंद अनुभवतात.
६. साधकांप्रतीच्या प्रेमभावात वृद्धी झाल्यामुळे इतरांना सर्वतोपरी साहाय्य करणे आणि आईप्रमाणे प्रेम देऊन कुटुंबभावना जोपासणे
काकूंमधील प्रेमभावात पुष्कळ प्रमाणात वृद्धी झाली आहे. त्यांना अंतरातूनच साधकांविषयी प्रेम वाटते. त्या स्वतःहून इतर साधकांची विचारपूस करतात आणि त्यांच्या स्तरावर त्या जे साहाय्य करू शकतात, ते साहाय्य त्या आवर्जून करतात. त्या आईचे प्रेम देऊन आईची न्यूनता भरून काढतात. एकदा माझा वाढदिवस होता. तेव्हा त्यांनी मला खोलीत बोलवले आणि गोड खाऊ अन् भेटवस्तू दिली. त्यांच्यामध्ये कुटुंबभावना जाणवते. त्यामुळे ‘प्रत्येक साधक हा श्री गुरूंचा असून आपण सर्व श्री गुरूंच्या कुटुंबातील सदस्य आहोत’, असा भाव काकूंमध्ये जाणवतो. त्यामुळे ‘त्या सगळ्यांना जोडून ठेवतात आणि स्वतःच्या कुटुंबात सामावून घेऊन सगळ्यांवर समप्रमाणात प्रेम करतात’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.
७. मनाची निर्मळता आणि गुरुदेवांवर दृढ श्रद्धा
काकूंचे मन निर्मळ आहे. त्या आहे त्या परिस्थितीत देवाला शरण जाऊन जे आवश्यक प्रयत्न करायला हवेत, तसे प्रयत्न करतात. यावरून ‘त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असून त्या श्रद्धेच्या बळावरच त्यांचे सर्व प्रयत्न अंतरातून चालू आहेत’, असे मला जाणवते.
८. आध्यात्मिक स्तरावर विचारमग्न असणे
‘काकू मानसिक स्तरावर विचार करत नसून आता आध्यात्मिक स्तरावर विचार करण्याचा प्रयत्न करतात’, असे मला जाणवले. ‘सतत आध्यात्मिक उपाय, व्यष्टी साधनेचे प्रयत्न आणि भावजागृतीचे प्रयत्न करणे’, असे त्यांचे प्रयत्न अखंड चालू असतात.
श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘भोसले काका आणि काकूंच्या माध्यमातून जे काही शिकायला मिळाले, ते सगळे स्वतःमध्ये आत्मसात करण्यासाठी गुरुदेवांनी तशी सद्बुद्धी द्यावी’, अशी त्यांच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आणि हा लेख लिहून घेतल्याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. संगीता चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.८.२०२४)
|