संगीतातील विविध रागांत नामजप गातांना सहकारनगर (पुणे) येथील श्रीमती लीला घोले (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८२ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती !
‘श्रीमती लीला घोले (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८२ वर्षे) या ‘संगीत अलंकार’ असून सहकारनगर (पुणे) येथील ‘सूर संवर्धन संगीत विद्यालया’च्या प्राचार्या म्हणून त्यांनी १५ वर्षे नोकरी केली आहे, तसेच त्यांनी १५ वर्षे शास्त्रीय गायनाच्या शिकवण्याही घेतल्या आहेत.
संगीतातील विविध रागांत ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा श्रीकृष्णाचा आणि ‘ॐ ॐ श्री वायुदेवाय नमः ॐ ॐ ।’, हा वायुदेवाचा नामजप गातांना श्रीमती लीला घोले यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
लेखातील काही शब्दांचे अर्थ
१. ‘खर्ज’ लावणे : मंद्र आणि अतीमंद्र (खालच्या पट्टीतील) सप्तकातील स्वरांना ‘खर्ज स्वर’, असे म्हणतात. खर्जातील स्वर लावणे, म्हणजेच खर्ज लावणे होय.
२. मंद्र सप्तकातील ‘षड्ज’ लावणे : गायन आणि वादन यांत प्रचलित असलेल्या तीन सप्तकांतील ‘मंद्र सप्तक’, हे पहिले सप्तक आहे. मंद्र सप्तकातील षड्ज स्वर लावणे, म्हणजे मंद्र सप्तकातील षड्ज लावणे होय.
३. मध्य सप्तक : तीन सप्तकांतील हे दुसरे सप्तक असल्याने याला ‘मध्य सप्तक’, असे म्हणतात. गायक आणि वादक या सप्तकाचा पूर्णपणे उपयोग करतात.
४. तार सप्तक : हे तिसरे सप्तक. गायक आणि वादक या सप्तकाच्या पूर्वार्धाचा म्हणजे ‘सा, रे, ग, म’, असा विशेषकरून उपयोग करतात.
संगीताच्या माध्यमातून साधनेत प्रगती करण्यासाठी काळानुसार संतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे म्हटलेला नामजप अधिक परिणामकारक असतो !
‘साधनेत ‘नामजप भावपूर्ण आणि एकाग्रतेने होणे’, हे आपले साध्य असते. गायन शिकलेल्या व्यक्तींना नामजप विविध रागांतून गाऊन अन्यांपेक्षा अधिक लवकर एकाग्रता आणि नामजपातील भाव अनुभवता येऊ शकतो. त्यामुळे गायन करणारे विविध रागांत नामजप करू शकतात; परंतु ‘अनेकातून एकात जाणे’, हा साधनेचा एक सिद्धांत आहे. त्यामुळे संगीताच्या माध्यमातून साधनेत प्रगती करण्यासाठी काळानुसार संतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे म्हटलेला नामजप अधिक परिणामकारक असतो. आरंभीच्या टप्प्याला साधक विविध रागांमध्ये नामजप करू शकतो; परंतु पुढे शास्त्रानुसार केलेला नामजप साधनेसाठी अधिक प्रभावी ठरू शकतो.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. विविध रागांत ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप गातांना आलेल्या अनुभूती
१ अ. राग ‘खमाज’ (१५.८.२०१९, रात्री ८)
१. ‘या रागात नामजप गातांना मला पुष्कळ छान वाटत होते.
२. हा राग गातांना मला माझ्या डोक्यात मुंग्या आल्याप्रमाणे संवेदना जाणवत होत्या. ‘त्या संवेदना हळूहळू माझ्या गालापर्यंत आल्या’, असे मला जाणवले.
३. तो आनंद मला पुष्कळ वेळ अनुभवता आला. तेव्हा ‘यातून बाहेरच येऊ नये’, असे मला वाटत होते. हा अनुभव मी पहिल्यादांच घेत होते.
१ आ. राग ‘तोडी’ (१५.८.२०१९, सकाळी ७)
१. ‘काळी २’ या पट्टीत माझा नामजप पुष्कळ भावपूर्ण आणि एकाग्रतेने होत होता.
२. माझ्या तोंडाला सारखे पाणी सुटत होते. तेव्हा ‘माझ्यावर आपतत्त्वाचे उपाय होत आहेत का ?’, असा विचार माझ्या मनात आला.
३. मी ‘खर्ज’ स्वर लावल्यावर मला माझ्या मणिपूरचक्राच्या खाली संवेदना जाणवू लागल्या.
४. मी मध्य सप्तकात गेल्यावर माझ्या मेंदूच्या उजव्या भागात पुष्कळ संवेदना जाणवू लागल्या.
५. जेव्हा मी ‘षड्ज (‘सा’ हा स्वर)’ लावला, तेव्हा आतल्या आत घुमणारा आवाज मला ऐकू आला. त्या वेळी मला माझ्या कमरेपर्यंत संवेदना जाणवत होत्या.
१ इ. राग ‘बागेश्री’ (१९.८.२०१९, सकाळी ६)
१. माझे मन पुष्कळ शांत आणि एकाग्र झाले.
२. जेव्हा माझा ‘खर्ज’ स्वर लागला, तेव्हा ‘माझ्या शरिरात पोकळी निर्माण झाली आहे आणि आवाज आतल्या आत घुमत आहे’, असे मला वाटले.
३. हा राग गातांना मला माझे मणिपूरचक्र आणि त्याखालील भागात पुष्कळ संवेदना जाणवत होत्या.
४. या वेळी माझ्या मेंदूच्या उजव्या भागात पुष्कळ संवेदना जाणवत होत्या.
५. माझा ‘षड्ज’ (‘सा’ हा स्वर) लागल्यावर (विशेषतः मंद्र सप्तकातील षड्ज लागल्यावर) मला पुष्कळ प्रसन्नता जाणवत होती.
६. ‘हा नामजप करत रहावा’, असे मला सारखे वाटत होते. माझ्याकडून अधूनमधून श्रीकृष्ण आणि सूर्यदेव यांना प्रार्थना होत होत्या.
२. राग ‘तोडी’मध्ये ‘ॐ ॐ श्री वायुदेवाय नमः ॐ ॐ ।’, हा नामजप गातांना आलेल्या अनुभूती (१५.८.२०१९, सायं. ६)
अ. माझ्या मनातील विचारांचे प्रमाण न्यून होऊन माझे मन एकाग्र झाले.
आ. मला माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्यासारख्या वाटत होत्या आणि माझ्या तोंडाला पाणी सुटत होते. (इतर वेळी माझे तोंड कोरडे पडते.)
इ. मी सहस्रारावर वायुतत्त्वाची मुद्रा (तर्जनी आणि अंगठा यांची टोके एकमेकांना जोडणे) केली. त्या वेळी माझ्या डोक्याच्या उजव्या भागात पुष्कळ संवेदना जाणवू लागल्या. तेव्हा माझ्याकडून अधूनमधून मारुतिरायाला प्रार्थना होत होती, ‘तुझी गदा सर्वत्र फिरून अनिष्ट शक्ती नष्ट होऊ दे.’
‘गुरुदेवा, ‘मला ही सर्व सूत्रे तुमच्या कृपेमुळे अनुभवता आली’, याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती लीला घोले (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८२ वर्षे) (संगीत अलंकार), सहकारनगर, पुणे. (२७.१०.२०२४)
|