Suvendu Adhikari On Bangladeshi Hindus : हिंदूंवर होणारी आक्रमणे थांबली नाहीत, तर सीमेवर आंदोलन करू !

बंगालचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार सुवेंदू अधिकारी यांची चेतावणी !

भाजपचे आमदार सुवेंदू अधिकारी

कोलकाता (बंगाल) – हिंदूंवरील आक्रमणे थांबली नाहीत, तर भारत-बांगलादेश सीमेवरील पेट्रोपोल येथे आंदोलन करण्यात येईल. बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांंची प्रतिक्रिया न्यूटनच्या गतीच्या तिसर्‍या नियमानुसार असेल, ज्यामध्ये प्रत्येक क्रियेसाठी समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते, अशी चेतावणी बंगालचे विरोधी पक्षनेते अन् भाजपचे आमदार सुवेंदू अधिकारी यांनी दिली आहे. (अधिकारी यांच्या या प्रतिक्रियेवरून जर कुणा भारतीय हिंदूने ‘बांगलादेशातील एका हिंदूवर झालेल्या आक्रमणावरून येथील १० बांगलादेशी घुसखोरांवर आक्रमण होईल’, असे पोटतिडकीने आव्हान दिले, तर त्याला अयोग्य म्हणायचे का ? – संपादक) नुकतेच ‘हिफाजत-ए-इस्लाम’ या बांगलादेशातील चितगाव येथील इस्लामी संघटनेने ‘इस्कॉन’वर बंदी घालण्याचे आवाहन केले होते. त्यावर अधिकारी यांनी वरील चेतावणी दिली.

सुवेंदू अधिकारी म्हणाले की, बांगलादेशाने समजून घेतले पाहिजे की, अल्पसंख्यांकांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या हक्कांचा आदर करणे, हे आपले कर्तव्य आहे. आम्ही बांगलादेशाच्या महंमद युनूस सरकारला चेतावणी देऊ इच्छितो की, हिंदूंवरील आक्रमणे थांबली नाहीत, तर आम्ही पेट्रोपोल सीमेवर आंदोलन करू. दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध पहाता भारत बांगलादेशी हिंदूंच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

संपादकीय भूमिका

केंद्रात भाजपचे सरकार असतांना अशी धमकी का द्यावी लागते ? सरकारने बांगलादेशावर दबाव निर्माण करून ही आक्रमणे थांबवून हिंदूंचे रक्षण करावे, असेच हिंदूंना वाटते !