Brampton Triveni Mandir : सुरक्षेच्या कारणास्तव ब्रॅम्प्टन (कॅनडा) येथील त्रिवेणी मंदिराकडून भारतीय वाणिज्य दूतावासाने आयोजित केलेला कार्यक्रम रहित !

पोलिसांनी सुरक्षेचे कारण फेटाळले

ब्रँप्टन (कॅनडा) – येथील त्रिवेणी मंदिराने सुरक्षेचे कारण देत भारतीय वाणिज्य दूतावासाने १७ नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेला कार्यक्रम रहित केला. मंदिराच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, त्यांनी पील प्रादेशिक पोलिसांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हा निर्णय घेतला. या माहितीमध्ये या कार्यक्रमाच्या दिवशी हिंसक निदर्शने होण्याचा धोका होता. दुसरीकडे पील प्रादेशिक पोलिसांनी अशी धमकी दिल्याचे मंदिराचे म्हणणे फेटाळून लावले आहे.

या संदर्भात पील प्रादेशिक पोलिसांनी एक निवेदन प्रसारित करून स्पष्ट केले की,  ‘पील प्रदेशातील प्रार्थनास्थळांना कोणतीही थेट धमकी मिळालेली नाही. आम्हाला प्रार्थनास्थळांवर निदर्शने आणि कथित धमक्यांविषयी समुदायाच्या चिंतेची जाणीव आहे. तथापि आम्ही सुरक्षा वाढवली आहे आणि हिंदु नेत्यांशी संपर्क साधून परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न करत आहोत.’

या संदर्भात त्रिवेणी मंदिराच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरात येणार्‍या भाविकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अलीकडेच ब्रँप्टनमधील हिंदु सभा मंदिरात हाणमारीची घटना घडल्यानंतर हा कार्यक्रम रहित करण्यात आला.

संपादकीय भूमिका 

हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तानी आक्रमण करत आहेत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे मंदिराकडून कार्यक्रम रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला असेल, तर त्यात तथ्य असण्याची शक्यता अधिक आहे; मात्र स्वतःची निष्क्रीयता लपवण्यासाठी कॅनडाचे पोलीस मंदिरावरच कार्यक्रम रहित करण्याचे खापर फोडत आहेत, असेच यातून लक्षात येते !