निवडणूक विशेष
उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची दुसर्या दिवशीही पडताळणी !
लातूर – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची सलग दुसर्या दिवशीही पडताळणी करण्यात आली. या वेळचा व्हिडिओ त्यांनी पुन्हा एकदा प्रसारित केला. लातूरमधून त्यांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणासही अनुमती नाकारण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांना पुढच्या सभेसाठी खोळंबून रहावे लागले.
मविआने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा !
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांची मागणी
मुंबई – हरियाणातील विधानसभा निवडणुकीत जो प्रकार घडला, त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात टाळायची असेल, तर महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
मुसलमानांचा मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा !
नाशिक – येथील पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मुसलमानांनी मनसे पक्षाला पाठिंबा न देता मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांना पाठिंबा दिला आहे. एका दर्ग्यात दिनकर पाटील यांनी मुसलमानांची भेट घेतली.
ठाणे येथे २३ कोटी ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त !
ठाणे – येथे आचारसंहितेच्या काळात मागील १ महिन्याच्या कालावधीत २३ कोटी ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १२ कोटी रुपयांची रोख रक्कम पकडण्यात आली असून यातील सर्वाधिक ४ कोटी रक्कम शहापूर विधानसभा मतदारसंघातून जप्त करण्यात आले, तर भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून १ लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. ओवळा माजिवडा मतदारसंघातून १ कोटी रुपयांचे अमली पदार्थ, तर ठाणे शहर विधानसभेतून ३ कोटी ३३ लाख रुपयांचे मतदारांना वाटण्यासाठीचे विनामूल्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
१० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त !
कोल्हापूर – आचारसंहिता चालू झाल्यापासून जिल्ह्यात तपासणी पथकांनी अमली पदार्थ, संशयास्पद वस्तू, बेहिशोबी रक्कम, कागदपत्रे उपलब्ध नसलेले दागिने असा १० कोटी ७१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत केल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.