कुचेली (म्हापसा) येथील सरकारी जागेतील अवैध घरे पाडण्यास प्रारंभ
म्हापसा, १२ नोव्हेंबर (वार्ता.) – खडपावाडा, कुचेली, म्हापसा येथील सरकारी जागेत अतिक्रमण करून अवैधरित्या (बेकायदेशीररित्या) बांधलेली ३६ घरे पाडण्यास १२ नोव्हेंबरला सकाळी प्रारंभ झाला. वर्ष २०१७ मध्ये ३० सहस्र १८७ चौरस मीटर जागा सर्वधर्मीय स्मशानभूमीसाठी संपादित करण्यात आली होती. ७ ऑक्टोबर २०२४ या दिवशी सर्वेक्षण अधिकारी या जागेचे सीमांकन करण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांना या जागेत अतिक्रमण करून अवैधरित्या घरे बांधण्यात आल्याचे आढळले.
त्यानंतर हा प्रकार बार्देश तालुक्याच्या उपजिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. अतिक्रमण करून बांधलेली ही घरे रिकामी करण्याची अंतिम नोटीस उपजिल्हाधिकारी कबीर शिरगावकर यांनी ४ नोव्हेंबर या दिवशी घरमालकांना जारी केली होती. सरकारी भूमीत अवैधरित्या बांधकाम केल्याबद्दल गोवा बांधकाम भूमी बंदी कायदा कलम ६ अन्वये उपजिल्हाधिकार्यांनी संबंधितांना नोटीस जारी केली होती. ही बांधकामे पाडण्यासाठी ‘अतिक्रमण हटवा’ पथकाची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार हे बांधकाम पाडण्याचे काम सुरळीत होण्यासाठी जागा रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
या जागेत अवैधरित्या घरे बांधण्यास पीडित लोकांना प्रोत्साहन देणार्या व्यक्ती मात्र अद्याप मोकाट आहेत. कोमुनिदाद किंवा सरकारने अद्याप यांपैकी कुणावरही कारवाई केलेली नाही.
संपादकीय भूमिकागोवा शासनाने अवैध घरे उभी रहाण्यास प्रोत्साहन देणारे, तेथील ग्रामपंचायत, त्यांना वीज आणि पाणी देणारे संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यावरही कारवाई केल्यास असे प्रकार थांबतील ! |