सरकारी नोकरीचे आमीष : पर्वरी येथील श्रुती प्रभुगावकर हिला अटक
|
पणजी, १२ नोव्हेंबर (वार्ता.) – सरकारी नोकरी देण्याचे आमीष दाखवून अनेकांना लुबाडणार्या प्रिया उपाख्य पूजा यादव, पूजा नाईक उपाख्य रूपा पालकर आणि दीपश्री सावंत गावस यांच्यानंतर पोलिसांनी पर्वरी येथील श्रुती प्रभुगावकर या आणखी एका महिलेस अटक केली आहे. तिने सरकारी नोकरी देण्याचे आमीष दाखवून अंदाजे १ कोटी ५० लाख रुपयांना फसवल्याचे आढळून आले आहे. तिची चौकशी केल्यानंतर फोंडा पोलिसांनी तिला अटक केली आहे.
श्रुती प्रभुगावकर ही महिला भाजपची कट्टर कार्यकर्ती होती, असे आढळून आले आहे. पर्वरीमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली तिने विविध कार्यक्रमदेखील आयोजित केले होते. या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. राजकीय ओळखीचा लाभ घेऊन तिने अनेकांना फसवल्याचा संशय आहे.
२ दिवसांपूर्वीच ढवळी येथील योगेश शेणवी कुंकळ्ळीकर या शिक्षकाला अशाच प्रकारे नोकरीचे आमीष दाखवून फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. त्याचप्रमाणे तारीवाडा, माशेल येथील संदीप जगन्नाथ परब याच्यावरही गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. परब याने ‘दीपश्री सावंत गावस हिने ४४ जणांकडून एकूण ३ कोटी ८८ लाख रुपये घेतले असून पैसे पोचले, तरी नोकरी दिली नाही’, अशी तक्रार म्हार्दाेळ पोलीस ठाण्यात ७ नोव्हेंबर या दिवशी प्रविष्ट (दाखल) केली होती. परब याने ‘नोकरी न मिळाल्याने लोक माझ्याकडे तगादा लावत आहेत आणि मला धमकी देत आहेत. राज्यातून विविध ठिकाणच्या सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांकडून हे पैसे संबंधीत गावातील काही जणांनी एकत्र केले आणि माझ्याकडे आणून दिले. मी ते पैसे दीपश्रीला दिले. नोव्हेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत हे पैसे गोळा करण्यात आले होते’, असे तक्रारीत म्हटले होते. याचा अर्थ ‘परब हेही या भ्रष्टाचारात सहभागी आहेत’, असा होत असल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे म्हार्दोळ पोलिसांनी संशयित संदीप जगन्नाथ परब याच्यावरही गुन्हा नोंद करून त्यालाही अटक केली आहे.
घोटाळ्यात भाजप सदस्यांचा सहभाग आढळल्यास तक्रार करा ! – नरेंद्र सावईकर
नोकरीचे आमीष दाखवून फसवणूक करणार्या श्रुती प्रभुगावकर या पूर्वी भाजपच्या सदस्या होत्या, हे मान्य करत पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र सावईकर म्हणाले, ‘‘या घोटाळ्यात सामील असलेल्या कुणावरही कारवाई करण्यास सरकार मागेपुढे पहाणार नाही. गोव्यात पक्षाचे साडेतीन लाख सदस्य असून या घोटाळ्यात भाजपचा कुणी सदस्य आढळल्यास त्याच्या विरोधात तक्रार करावी. सरकार कठोर कारवाई करील. श्रुती प्रभुगावकर हिचा सध्या पक्षाशी कोणताही संबंध नाही. पूर्वीची एखादी कार्यकर्ती घोटाळ्यात सहभागी असली; म्हणून पूर्ण भाजप पक्षाची अपकीर्ती करणे योग्य नाही.’’ रोजगार घोटाळ्याच्या प्रकरणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते.