प्रतिदिन पदार्थांच्या माध्यमातून पोटात जाणार्‍या विषवत् स्थितीवर उपाययोजना !

सध्याच्या पालटत्या युगातील आजार उत्पन्न करणार्‍या नवीन कारणांना तोंड देत असतांना सगळ्यांमध्ये एक साधारण गोष्ट दिसते ती, म्हणजे प्रतिदिन या ना त्या स्वरूपात आपल्या पोटात जात असणारी विषे. ही विषे फळे आणि भाज्या यांतून जाणारी खते, आम्लधर्मी वायू आणि रसायने यांमुळे, प्रतिदिन शरिरात घेतली जाणारी हवा अन् पाणी, पॅकबंद केलेल्या अन्नामध्ये ‘शेल्फ लाईफ’ (साठवणकाळ) वाढावे म्हणून घातलेले ‘प्रिझर्व्हेटिव्हस्’ (पदार्थ खराब होऊ नये; म्हणून त्यात घालण्यात येणारा पदार्थ), वेळच्या वेळी जेवण न केल्याने, व्यायाम नसतांना वेळी अवेळी अधिक खाल्ले गेलेले, शरिरात साचत गेलेले न पचलेले अन्न विषार, दिवसा झोपणे आणि शरिराला अहितकर असे वारंवार खाणे या सगळ्यांतून शरिरात साचत जातात. रासायनिक औषधे, चांगल्या ‘गट फ्लोराला’ही (आतड्यातील सूक्ष्म जीव) मारणार्‍या ‘अँटीबायोटिक्स’ (प्रतिजैविके) यांचा अवास्तव वापर आणि तो नीट करण्यासाठी प्रयत्न केला न जाणे, ही सर्व कारणेही काही काळाने शरिरावर विषवत् परिणाम दाखवतात.

सध्याच्या भाषेमध्ये बोलायचे, तर सगळ्यांच्या शरिरात दाहक पालट होतांना दिसत आहेत. यामध्ये सूक्ष्म जीवाणूंच्या भूमिका नसतात. आपल्या शरिरात होत गेलेल्या पालटांना वेळीच आळा घालण्यासाठी प्रयत्न न केल्याने झालेले परिणाम असतात. हे विषार साचत जाण्याने उदर, मूळव्याध, वेगवेगळ्या सूज इत्यादि विविध आजार होतात, असे आयुर्वेदात वर्णन आहे.

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो ?

१. सर्वसामान्य खाण्याचे आणि विहाराचे नियम पाळणे (वेळा, पदार्थांची निवड इत्यादी).

२. मनाने कोणतेही औषध घेण्यापेक्षा वैद्यकीय सल्ल्याने औषधे घेणे. ‘सिंथेटिक’ औषधे (कृत्रिम रसायने संयुक्त प्रयोग करून बनवलेली औषधे) अधिकाधिक टाळणे. (जरी ती वनस्पतीमधील सक्रीय घटकांपासून बनवली असली, तरीही कारण अख्खी वनस्पती वापरणे आणि त्यातील एक रसायन काढून वापरणे यांत पुष्कळ तफावत आहे.)

३. अधिकाधिक आजारांसाठी आयुर्वेदाची कास धरली, तर बाकी औषधे वापरायचे प्रमाण पुष्कळ न्यून होते, तोच रोग होण्याची वारंवारता न्यून होते.

४. घरी बनवलेले ताजे पदार्थ खाणे, जेणेकरून त्यातील रासायिनक पालट शरिरावर दूरगामी परिणाम दाखवत नाहीत. ‘रेडी टू ईट’ (खाण्यास सिद्ध पदार्थ) आणि ‘पॅक्ड फूड’ (सीलबंद पदार्थ) अगदीच आवश्यकतेपुरते ठेवावे.

५. वैद्यांना रसायन चिकित्सेविषयी विचारणे. रसायन म्हणजे केवळ च्यवनप्राश नव्हे !

६. बर्‍याचशा गोष्टींना सहन करण्याची शक्ती व्यायामाने वाढते. अगदी साधा नियमित केलेला चालण्याचा व्यायामही चालेल; पण त्यात नियमितता आणि सातत्य महत्त्वाचे.

७. दुसर्‍याविषयी तुलना, द्वेष, मत्सर, ईर्ष्या न ठेवता स्वतःचे काम आणि प्रगती यांकडे लक्ष ठेवावे. याने मनाचा दाह आणि चिंतेने होणारे पचनावरील परिणाम टळतात.

वरील कारणांनी शरिरातील धातूंमध्ये काही विशिष्ट पालट झाल्याने एक प्रकारचा दाह उत्पन्न व्हायला लागतो. हे काही मूळ नियम आणि रसायन औषधे यांचे साहाय्य घेऊन आरोग्य सांभाळणे श्रेयस्कर !

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.