प्रतिनिधित्वाची जाण (?)
दूरचित्रवाहिनीवर वृत्तनिवेदन करणार्या निवेदिकांची वेशभूषा बहुतांशी पाश्चात्त्य पद्धतीची असते. तोकडे कपडे घालून मोठ्या महिला किंवा युवती वृत्तनिवेदन करत असतात. यासह ‘सुपरस्टार सिंगर’, ‘इंडियन आयडॉल’, सार्वजनिक कार्यक्रम, पुरस्कार सोहळे, लहान मुलांचे गायन, नृत्य आदी कार्यक्रमांतही स्त्री निवेदक, परीक्षक, स्पर्धक सर्वांचीच वेशभूषा सांस्कृतिकदृष्ट्या विचार करता अयोग्य प्रकारची असते. याउलट पुरुष निवेदक, परीक्षक, स्पर्धक यांची वेशभूषा व्यवस्थित, म्हणजे पूर्ण अंग झाकणारी असते. महिलांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, अंगप्रदर्शन म्हणजे ‘फॅशन’ असे समीकरण झाले आहे का ? समाजाच्या प्रवाहासह वहात जातांना आपणच ‘स्त्री’त्वाची विटंबना करत आहोत का ? ज्या सामाजिक, सांस्कृतिक घटकांचे आपण प्रतिनिधित्व करत आहोत, तो खरोखरच असा आहे का ?
वेशभूषेचा ती करणार्याच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर परिणाम होतो, तसाच तो ती पहाणार्यावरही होत असतो. ‘द्रष्टा दृश्यवशात् बद्ध: ।’, म्हणजे आपण जे पहातो, त्याप्रमाणे व्यक्तीचे विचार पालटतात. त्यामुळे सामाजिक भान जोपासत धर्माचरण करत योग्य वेशभूषा परिधान करणे आवश्यक आहे.
विदेशातील वृत्तवाहिन्या, कार्यक्रम यांमध्ये निवेदन करणे, विविध कार्यक्रमांत सहभाग घेणे या वेळी तेथील लोक त्यांच्या धर्माचे पालन करतांना आढळतात. अन्य धर्मियांमधील महिला किंवा मुलीही त्यांच्या धर्मानुसार वेशभूषा करत वृत्तनिवेदन करतात. शाळा-महाविद्यालयातही तशाच पद्धतीने जातात. याठिकाणी तुलना करण्याचा निश्चितच हेतू नाही. पारंपरिक वेशभूषा ही सण-उत्सवापुरती मर्यादित ठेवणे अयोग्य आहे. अन्य वेळीही धर्म, संस्कृती जोपासली जाण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे. याचा अर्थ प्रतिदिन साडीच नेसावी, असे नाही; मात्र शरीर झाकले जाईल, अशा पद्धतीची वेशभूषा असावी.
पूर्वीच्या काळी स्त्रिया नऊवारी नेसत असत. काही काळाने सहावारी साडी आली. मग पंजाबी ड्रेस, तसेच विनाबाह्यांचे पोशाख, स्कर्ट आले. कपड्यांचा आकार हळूहळू न्यून होत तो तोकडा किंवा अर्धनग्न असाही गणला जाऊ लागला आहे. याचे उदात्तीकरण बहुतांश वेळा सामाजिक स्तरावर प्रतिनिधित्व करणार्यांकडून केले जाते. त्यांनी ‘लाज’, ‘लज्जा’, ‘सन्मान’, ‘आदर’ हे शब्दच जणू बासनात गुंडाळले गेलेले आहेत. याविषयी संबंधितांना कसलेही सुवेरसुतक नाही. त्यामुळेच समाज रसातळाला जात आहे, नव्हे नव्हे तो तेथपर्यंत पोचलेला आहे. याला कारणीभूत असणार्यांना खडसावण्याची वेळ आलेली आहे.
– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी