‘गुरुपौर्णिमा सोहळ्याचा सहआयोजक’ या नात्याने सेवा करतांना ‘सेवेतील प्रत्येक टप्प्यावर श्री गुरु सांभाळून घेत आहेत’, याची साधकाला आलेली प्रचीती !
‘वर्ष २०२४ मध्ये कुडाळ येथे झालेल्या ‘गुरुपौर्णिमा सोहळ्याचा सहआयोजक’ या नात्याने साधकाला सेवा मिळाली होती. तेव्हा आरंभी त्याच्या मनाची नकारात्मक स्थिती होती; मात्र नंतर प्रत्येक टप्प्यावर त्याला श्री गुरुंचे साहाय्य मिळाले आणि त्याच्या मनाचा कोणतीही सेवा करण्याचा निर्धार झाला. त्याविषयीची माहिती येथे दिली आहे.
१. ‘गुरुपौर्णिमेचा सहआयोजक’ ही सेवा मिळाल्यावर आरंभी मनाची स्थिती नकारात्मक असणे आणि उत्तरदायी साधकांचे बोलणे ऐकून ‘ही देवाची इच्छा आहे’, अशी जाणीव होऊन सेवा स्वीकारणे
‘गुरुपौर्णिमेचा सहआयोजक’ अशी सेवा मिळाल्यावर आरंभी माझ्या मनाची स्थिती नकारात्मक होती. ‘अशा प्रकारची सेवा करणे’, हे माझ्यासाठी नवीनच होते. माझ्या मनाची स्थिती दोलायमान असतांना गुरुपौर्णिमेचे मुख्य आयोजक साधकांचा मला भ्रमणभाष आला. ते मला म्हणाले, ‘‘आपण ही सेवा करूया ना ? यातून आपल्याला शिकायला मिळेल.’’ त्यांचे बोलणे ऐकून माझा आत्मविश्वास वाढला. माझ्या मनात ‘त्यांना माझ्या मनाची स्थिती कशी समजली ?’, असा विचार आला. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘हे देवाचेच नियोजन आहे. देवाचीच ही इच्छा आहे की, ‘मी ही सेवा स्वीकारावी आणि त्यातून शिकावे.’ या विचाराने मी उत्तरदायी साधकांना होकार दिला.
२. ‘सेवेतील प्रत्येक टप्प्यावर श्री गुरु सांभाळून घेत आहेत’, याची जाणीव होणे
आरंभी मला गुरुपौर्णिमा सोहळ्याच्या आयोजनाविषयी काहीच ठाऊक नव्हते. त्यामुळे माझ्याकडून प्रत्येक टप्प्यावर अनेक चुका होत होत्या. मला ‘काय करावे ?’, हे सुचत नव्हते. त्या वेळी शेती आणि कार्यालयीन काम यांचा व्याप पुष्कळ वाढला होता. त्यामुळे मला सेवेला आवश्यक तेवढा वेळ देता येत नव्हता; मात्र जसजसे दिवस पुढे जात होते, तसतसे ‘प्रत्येक प्रसंगात देव आणि श्री गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला सांभाळून घेत आहेत’, याची मला जाणीव झाली. माझी श्री गुरूंप्रती अपार कृतज्ञता व्यक्त झाली.
३. सवलत न घेता सेवा केल्यामुळे यश येणे
माझ्यामधील ‘सवलत घेणे’ या स्वभावदोषामुळे मी अनेक गोष्टींत मागे पडतो. या पूर्वी माझ्याकडे अन्य सेवांचे दायित्व होते. या सेवांची व्याप्ती अल्प असूनही मी अनेक वेळा सवलत घेत असे. गुरुपौर्णिमेच्या सेवेतही प्रारंभी तसे घडत होते. ‘मी असे केल्यास त्याचा परिणाम सर्व सेवांवर होईल. त्यामुळे मला आता दायित्व घेऊन सर्व स्वीकारायला आणि करायला हवे’, याची मला जाणीव झाली. त्यानंतर मी प्रयत्न चालू केले आणि मला त्यात यश आले.
४. ‘क्षमता वाढवण्यासाठी गुरुपौर्णिमेची सेवा मिळाली आहे’, याची जाणीव होणे
मी सेवा करत असतांना ‘देवाने मला ही सेवा माझी क्षमता वाढवण्यासाठी आणि कौशल्य आत्मसात् करण्यासाठीच दिली आहे’, याची मला जाणीव झाली अन् प्रत्यक्षात तसे घडलेही. त्यामुळे आता ‘कोणत्याही सेवेचे दायित्व घेण्याची संधी मिळाली, तर ती आनंदाने स्वीकारीन’, असा माझ्या मनाचा निर्धार झाला.
५. गुरुपौर्णिमा झाल्यावर सेवेत झालेल्या चुकांच्या संदर्भात झालेला सत्संग ‘गुणसंवर्धन सत्संग आहे’, याची जाणीव होणे
गुरुपौर्णिमा झाल्यावर सेवेत झालेल्या चुकांच्या संदर्भात स्वभावदोष निर्मूलन सत्संग झाला. त्या वेळी प्रारंभी मला थोडा ताण आला होता. त्या सत्संगात माझी एक चूक सांगितल्यावर माझ्यामधील अनेक स्वभावदोष सद्गुरु सत्यवान कदम आणि सहसाधक यांच्या माध्यमातून माझ्या लक्षात आले. ‘या वेळी मी कुठे अल्प पडलो ?’, हे सुस्पष्टपणे माझ्या लक्षात आले. या सत्संगात सद्गुरु सत्यवानदादांनी माझ्यातील कर्तेपणाची जाणीव करून दिली. या सत्संगातून अनेक पैलू समोर आले. त्यामुळे ‘हा चुकांच्या संदर्भातील सत्संग नसून गुणसंवर्धन सत्संग आहे’, याची मला जाणीव झाली.
६. सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे लिहीत असतांना चंदनाचा सुगंध येणे
एकदा मी रात्री उशिरा सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे लिहीत होतो. त्या वेळी सभोवती उदबत्ती लावलेली नव्हती किंवा कोणताही सुगंधी पदार्थ नव्हता, तरीही मला चंदनाचा सुगंध आला. त्या वेळी माझी श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. ‘मी गुरुसेवेसाठी चंदनापरी झिजलो की, माझ्या आयुष्यालाही श्री गुरुकृपेचा असाच सुगंध दरवळेल’, याची मला जाणीव झाली.
७. कृतज्ञता
‘श्री गुरूंनी या अल्पमती जिवाला घडवण्यासाठी अपार कष्ट घेतले. त्यांनी माझ्याकडून हे कृतज्ञतारूपी पुष्प अर्पण करून घेतले’, त्याबद्दल मी श्री गुरु, सद्गुरु आणि संत यांच्याप्रती कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
गुरुसेवेसाठी देह झिजावा चंदनापरी ।
आयुष्याला सुगंध यावा गुरुकृपेचा ।
लोखंडाचेही परिस बनावे ।
स्पर्श होता श्री गुरुचरणांचा ।।’
– श्री. राजाराम कृष्णा परब, मु.पो. तेर्सेबांबर्डे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (३१.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |