भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘संत नामदेव महाराज घुमान सायकल वारी’चे आयोजन !
१३ नोव्हेंबरला सायकल वारी पुण्यात येणार !
पुणे – संत नामदेव महाराज यांच्या ७५४ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्रीक्षेत्र घुमान (पंजाब) पर्यंत सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन भागवत धर्म प्रसारक मंडळ, नामदेव समाजोन्नती परिषद, महाराष्ट्र राज्य, पालखी सोहळा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, श्री नामदेव दरबार कमेटी श्री क्षेत्र घुमान (पंजाब) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या सायकल वारीला १२ नोव्हेंबरला श्रीक्षेत्र पंढरपूरहून आरंभ झाला असून सोलापूर, सातारा, निरा, जेजुरी सासवड, हडपसर मार्गे १३ नोव्हेंबरला ही वारी सायंकाळी पुण्यात येणार असल्याची माहिती नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर शाखेचे अध्यक्ष संदीप लचके यांनी दिली.
विठ्ठलभक्तीचा आणि शांती, समता-बंधुता हा भागवत धर्माचा प्रचार, प्रसार करण्यासाठी प्रतिवर्षी ही सायकल वारी काढली जाते. सायकल वारीचे यंदाचे चौथे वर्ष आहे. या वारीमध्ये श्री संत नामदेव महाराज यांचा रथ, ४ गाड्या, १०० सायकलचालक, ३० वारकरी भजनी मंडळ, १० सेवेकरी, वाहनचालक आणि व्यवस्थापक यांच्या समावेश असणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यांतून प्रवास करत ही सायकल वारी ४ डिसेंबरला श्रीक्षेत्र घुमान येथे पोचणार असल्याची माहिती नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर शाखेचे सचिव सुभाष मुळे यांनी दिली.