चिंचवड (पुणे) येथे जुगाराचा अड्डा चालवणार्या ३१ जणांवर गुन्हा नोंद !
पिंपरी (पुणे) – करमणूक केंद्राच्या नावाखाली जुगार अड्डा असलेल्या ठिकाणी चिंचवड पोलिसांनी धाड घालून ३१ जणांवर गुन्हा नोंद केला. या कारवाईत १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई चिंचवड, बिजलीनगर येथील ओम कॉलनी क्रमांक १ मधील ‘आधार बहुउद्देशीय संस्था’ येथे करण्यात आली.
पोलीस गस्त घालत असतांना बिजलीनगर येथे आधार बहुउद्देशीय संस्थेला करमणूक केंद्राचा परवाना असतांना त्या ठिकाणी काही लोक एकत्र जमून जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी धाड घातल्यावर आरोपी हे स्वतःच्या आर्थिक लाभासाठी आपापसांत जुगार खेळतांना आढळले. या आधार बहुउद्देशीय संस्थेचा परवानाधारक अभिमान मिसाळ आणि त्याच्या कामगारांनी करमणूक परवान्याचा भंग करून तीन पत्ती जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली.